मुंबई, (प्रतिनिधी) : लखीमपूर-खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्र बंद’ला राज्यात चांगले यश मिळाले. ठाणे, जळगाव येथील तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने मोटार घातल्याने चार शेतकर्‍यांचा व नंतरच्या हिंसाचारात आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेचे देशभर संतप्त पडसाद उमटले. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने काल महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. या बंदला राज्याच्या सर्व भागात चांगले यश मिळाले. भाजपने या बंदला विरोध करताना बंद हाणून पाडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. पण, तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला. मुंबईत काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवन परिसरात मौन आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकासमोर धरणे आंदोलन केले.

उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण

ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती व अन्य शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर फिरत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भुसावळमधील वरणगावात बंदला गालबोट लागले. वरणगाव शहरात महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात चार ते पाच कार्यकर्ते जखमी झाले.

शाब्दिक चकमक

जळगाव शहरात काही ठिकाणी व्यापारी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुकाने बंद करण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. जळगावात सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवला नाही. महाआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले होते. त्यानतंर मुख्य बाजारपेठ तासभर बंद होती. नेते निघून जाताच व्यापार्‍यांनी पुन्हा दुकाने उघडतील. दुपारपर्यंत सुरू-बंदचा खेळ सुरू होता.

कार्यकर्त्यांचा काढता पाय

जामनेरमध्ये आघाडीचे कार्यकर्ते आणि एका दुकानदारामध्ये जोरदार वाद झाला. कार्यकर्त्यांनी दुकान बंद करण्यास सांगितले. परंतु, त्याने ऐकले नाही. त्यानंतर वाद विकोपाला गेला. शेवटी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत तेथून काढता पाय घेतला.

औरंगाबादमध्ये मोर्चा

औरंगाबादमध्ये बंदला संमिश्र यश मिळाले. बंदमध्ये व्यापार्‍यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत दुकानेदेखील बंद केली. पैठणगेट ते शहागंज असा मोर्चा काढत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापार्‍यांना केले होते.

पुण्यात बंद शांततेत

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला शहरात संमिश्र यश मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पीएमपी आणि शहरातील मुख्य बाजारपेठा दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे जिल्हा व पोलिस प्रशासनाने निःश्वास सोडला.

काल सकाळी सहापासूनच तीनही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी नागरिकांना दुकाने आणि बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन केले. पीएमपी सुरू होण्याआधीच कार्यकर्ते डेपोमध्ये पोहोचले आणि आंदोलन केले. त्यामुळे पीएमपी सुरूच होऊ शकली नाही. सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी असल्या, तरी शहरात रस्त्यावर रिक्षा दिसत होत्या. पीएमपी बंद असल्यामुळे रिक्षांना मागणी वाढली. रिक्षाचालकांनी अवाच्या सव्वा भाडे आकारले. मात्र, ओला आणि उबेरच्या सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मार्केट यार्डातील व्यापार्‍यांनी बंदला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतमाल बाजारात आणला नाही.

व्यापारी महासंघाकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठांमधील दुकानदार बंदमध्ये सहभागी झाले होते. हॉटेल व्यावसायिकदेखील बंदमध्ये सहभागी झाले. काही दुकानदारांनी दुपारी तीननंतर दुकाने सुरु केली. हॉटेलदेखील तीन नंतर सुरू झाली. पीएमपी सेवादेखील दुपारनंतर सुरू झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा