मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप व आघाडीच्या नेत्यांमध्ये ‘महाराष्ट्र बंद’वरून आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला. हा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद व आघाडीचा ढोंगीपणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर शेतकर्‍यांच्या मारेकर्‍यांना सगळे ढोंगच वाटणे स्वाभाविक असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला सत्तेची मस्ती आली असून, शेतकर्‍यांना चिरडून मारणार्‍यांचे समर्थन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असल्याची जळजळीत टीका केली.

शेतकर्‍यांच्या बाजूने जो बोलतो तो ढोंगी-दहशतवादी असतो; हे भाजपचे धोरण आहे. शेतकर्‍यांच्या विरोधातील काळे कायदे आणले. त्यांच्या अंगावर मोटार घातली. शेतकर्‍यांची हत्या करणे भाजपचा धंदा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बंद हा शेतकर्‍यांच्या मारेकर्‍यांना ढोंगच वाटेल, अशा शब्दांत नाना पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केला. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू असून, उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकर्‍यांचे बळी दिले जात आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनी, लखीमपूर घटना क्लेशकारक व माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची टीका केली. या घटनेचा व्हिडिओ सर्वांनी बघावा. त्यात माणुसकी दिसते आहे का ते सांगावे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. सरकार कुणाचेही असो, पण जे घडले ते चिंताजनक आहे. केंद्र सरकारने जनतेला व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया यांनी केली. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी, हा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. याच मंडळींनी मावळमध्ये पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तेथील सरकार दोषींवर कारवाई करत आहेत. मात्र, राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का, या संकुचित विचाराने बंद पुकारला आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करून लोकांना बंद ठेवायला भाग पाडले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कोरोनानंतर आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र, पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली. हे बंद सरकार आहे. आधी योजना बंद केल्या, त्यानंतर अनुदान बंद केले. कोरोनाकाळात जेव्हा देश सुरू होता, तेव्हा राज्य बंद केले आणि आता कुठे छोट्या व्यावसायिकांचे गाडे रुळावर येत आहे, तर आता पुन्हा सरकारने बंद पुकारला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा