देशात किंवा पुरोगामी महाराष्ट्रात चूल आणि मूल ही मानसिकता धुडकावून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने उभी असली, तरी पुरुषप्रधान संस्कृतीचा तिला सामना करावा लागत असल्याचे हे वास्तव आहे. सर्वत्र परिवर्तन झाले, मात्र पुरुषांच्या मनात, विचारात परिवर्तन झालेले नाही. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी नारीने समाजाकडे डोळसपणे पाहून आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. कुटुंब आणि प्रशासकीय कामकाज याची उत्तम सांगड घालत हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील ही नवदुर्गा इतर महिलांसाठी प्रेरणाशक्ती निर्माण करत आहे.

पुरुषसत्ताक जगात स्त्रीने अगोदर स्वतः स्वतःचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. स्वतःमध्ये असणारी शक्ती, ऊर्जा ओळखत नाही, तोपर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कायम राहील. केवळ पुरुषांची मानसिकता बदलून उपयोग नाही. त्यामुळे स्त्रीने संकुचित विचार सोडून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार करावे. त्यासाठी घराबाहेर पडून समाज, आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींकडे डोळसपणे बघावे, जागृत राहून समाजाच्या प्रवाहात वाहून घेणे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी शिक्षण, स्वसंरक्षण आदी आत्मसात करून आत्मनिर्भर झाल्यास महिलांवरील अत्याचारदेखील कमी होतील.

स्त्रीला तिची कर्तव्य कधीच सुटलेली नाही. जन्मतःच स्त्रीमध्ये शांत, संयम, सहनशीलता, मृदुता, मातृत्व, शिस्त, काटकसर गुणानुसार ती कर्तव्य पार पाडत असते. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग त्यामानाने कमी आहे. ग्रामीण भागातील स्त्री अद्याप चूल, मूल या पंरपरेच्या जोखडात अडकून आहे. एकीकडे एका स्त्रीने चंद्रावर पाय ठेवला असताना दुसरीकडे अनेक स्त्रियांनी घराबाहेर पाऊल काढलेले नाही, ना घराचा उंबरा ओलांडलेला नाही. याला कारण पुरुषांची मानसिकता. पूर्वीपासूनच महिलेला वस्तू म्हणून पाहिले जात असून ही मानसिकता बदलेली नाही. पुरुषांच्या विचार करण्याची पद्धत बदलले तरच परिवर्तन होईल.

स्त्री शिक्षणाने स्वयंपूर्ण असली तरी प्रशासकीय, शासकीय, राजकीय किंवा इतर क्षेत्रात तिला संधी असताना तिने नाकारल्याचे दिसून येते. परंतु, प्रत्येक वेळीच पुरुषांकडूनच महिलांना दुटप्पी वागणून दिली जाते, असे नाही. विविध क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रीला वरिष्ठांकडून जाच असतोे, असे नाही. स्त्री कुटुंबवत्सल असल्याने कामाशी काम अशी तिची मानसिकता तशी असते. त्यामुळे परस्पर संवाद होत नाही, मतभेद निर्माण होऊन अडचणी निर्माण होतात. विशेषतः प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात. पण, कुठल्याही क्षेत्रात काम करता भूमिका आणि संवाद महत्त्वाचा आहे. सौहार्दपूर्ण परस्पर वागणूक दिल्यास अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळच उद्भवत नाही.

ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्याशिवाय संसार उभा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयाशिवाय कारभार चालवला जाऊ शकत नाही. एखादी महिला कितीही उच्चशिक्षित असली, तरी ती करत असलेल्या कामाबरोबर कुटुंबातील जबाबदारींचा स्वीकार आणि सांभाळ सहजतेने करत असते. हेच कौशल्य वापरून महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी प्रयत्न केल्यास खर्‍या अर्थाने स्त्री-पुरुष समानता निर्माण होण्यास विलंब लागणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला कमावू लागल्या आहेत. परंतु, स्त्रीपण निभावणे ही सोपी गोष्ट नाही. स्त्री म्हणजे सहनशक्तीची परीक्षाच आहे. परंतु, पुरुषसत्ताक जगात स्त्रीने अगोदर स्वतः स्वतःचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. स्त्रीने स्त्रीत्वाच्या जाणिवेतून, पुरुषांनी पुरुषत्वाच्या जाणिवेतून मुक्ती मिळवून ‘माणूसपणा‘च्या पातळीवर आल्यास खर्‍या अर्थाने निरोगी समाजव्यवस्था तयार होण्यास विलंब लागणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा