पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकर्‍यांना केंद्रातील मंत्र्यांच्या मुलांने गाडीखाली चिरडून मारण्याच्या घडलेच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मार्केटयार्डातील आडते, कामगार, वाहनचालक आणि शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सोमवारी फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग कडकडीत बंद होता.
मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, पान विभागात एकाही गाडीची आवकच झाली नाही. बंदबाबत आडत्यांनी शेतकर्‍यांना दोन दिवसांपूर्वी कल्पना दिली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी माल पाठविला नाही. बेजारातील बहुतांश घटक बंदमध्ये सहभागी झाले होते. भुसार बाजारात बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. मार्केटयार्डातील फुलबाजारावर मात्र बंदचा परिणाम झाला नाही. बाजार सुरळीत सुरु होता. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे मंदिरे बंद होती त्यामुळे फुलबाजारात निरुत्साहाचे वातावरण होते. नुकताच बाजार सुरळीत झाला आहे. त्यामुळे बंद करणे शेतकर्‍यांच्या हिताचे नसल्याने तसेच काही शेतकर्‍यांनी बाजारात माल पाठविल्याने फुलबाजार सुरळीत सुरू होता.
पुणे व्यापारी महासंघाने बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील विविद प्रकारची दुकाने बंद होती, तर काही दुकाने दुपारनंतर उघडली होती. शहराप्रमाणेच उपनगरातील विविध प्रकारची बहुतांश दुकाने दुपारपर्यंत कडकडीत बंद होती. रिक्षा पंचायत, हमाल, तोलणार, मापाडी, आडते, टेम्पो, महात्मा फुले, महाराष्ट्र राज्य अण्णशसाहेब पाटील जनरल कामगार संघटनांनींही बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरात महाविकास आघाडीने पुकारलेला बंद पूर्णत: यशस्वी झाला.
टेम्पो चालकांचा प्रतिसाद
मार्केटयार्ड टेम्पो पंचायतीचे सुमारे 4 हजार सदस्य आहेत. बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सर्व टेम्पो चालकांनी वाहन रस्त्यांवर न काढता बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे काल दिवसभरात मार्केटयार्ड परिसरात एकही टेम्पो धावला नाही. तसेच हमाल पंचायत आणि कामगार संघटनेचे 3 हजार सदस्य बंदमध्ये सहभागी झाले होते.- संतोष नांगरे, अध्यक्ष, मार्केटयार्ड टेम्पो पंचायत.
बंद शंभर टक्के यशस्वी
फळे भाजीपाला विभागात हिमाचल प्रदेशातून तीन ते चार दिवसांपूर्वी निघालेल्या सफरचंदाच्या गाड्यांशिवाय इतर आवक झाली नाही. फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभागात बंद 100 यशस्वी झाला आहे़. आडत्याप्रमाणे शेतकर्‍यांनीही माल न पाठवून बंदला प्रतिसाद दिला. -विलास भुजबळ, अध्यक्ष, मार्र्केटयार्ड आडते असोसिएशन.
नाशवंत मालामुळे बाजार सुरू ठेवला
फुले हा नाशवंत माल आहे. बंदला व्यापार्‍यांनी पाठींबा दिला होता. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले होते. त्यातच गेल्या आठ दिवसांपूर्वी बंद झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच नवरात्र आणि दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर बाजार सुरु ठेवला होता़. – अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशन

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा