हवामान विभागाची घोषणा
पुणे ः देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यानंतर राजस्तानातून नैऋत्य मोसमी वार्‍यांनीं (मान्सून) परतीचा प्रवासाला वेगाने सुरूवात केली आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मान्सून माघारी परतला असल्याचे सोमवारी हवामान विभागाने जाहीर केले.
मागील बुधवारी पश्चिम राजस्तान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी वायव्य भारतातून मान्सून परतला. शनिवारी मान्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. सोमवारी संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मान्सून परतला असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशाचा आणखी काही भाग, तसेच ईशान्य भारताच्या काही भागातून मान्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनच्या परतीसाठी निर्माण झालेले पोषक हवामान कायम राहिल्यास पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य भागातूनही मान्सून लवकरच माघारी परतेल. तसेच राज्यातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा