पुणे ः केसरी-मराठा संस्थेच्या वतीने ‘केसरी’चे माजी विश्वस्त आणि संपादक, साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकासाठी यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिखित ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी-नेतृत्वाची सांधेजोड’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरूप आहे.
गुरूवार दि. 14 ऑक्टोबर रोजी न.चिं. केळकर यांची 74 वी पुण्यतिथी आहे. त्यादिवशी सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन होईल. ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. हे दोघेही 1915 ते 1920 या दरम्यान एकत्र कार्यरत होते. पाच वर्षांच्या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मवाळ व जहालांमधील संघर्ष निकाली निघाला; सामाजिक सुधारणांची मागणी ऐरणीवर आली. इंग्रजांविरूध्दच्या लढ्याची पायाभरणी झाली. हे सर्व टिळक आणि गांधी यांच्या साक्षीने व सहभागाने घडून आले. याच काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे एका अर्थाने टिळकांनी गांधीजींना सोपवली. टिळक आणि गांधी यांचे स्वातंत्र्यासाठी स्वतंत्रपणे व एकत्र येऊन काय प्रयत्न चालले होते? त्यांच्या सहमतीचे आणि मतभेदाचे मुद्दे कोणते होते? या दोघांचे स्वतंत्र भारताबद्लचे संकल्पचित्र काय होते? या व अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दयांचा परामर्श घेणारे आणि दोन महापुरूषांच्या नेतृत्वाची सांधेजोड ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी-नेतृत्वाची सांधेजोड’ या पुस्तकातून न्यायमूर्ती चपळगावकर यांनी उलगडली आहे. हा ग्रंथ पुण्यातील समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.
न्यायमूर्ती चपळगावकर यांनी वकिली व्यवसायाचा प्रारंभ वडील पुरूषोत्तम चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला. पुरूषोत्तम चपळगावकर हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी होते व दिवाणी कायद्यातील तज्ज्ञ होते. 16 जून 1962 पासून 28 वर्षे चपळगावकर यांनी बीड, मुंबई, औरंगाबाद येथे वकिली केली. 19 जून 1990 मध्ये राष्ट्रपतीनीं मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती केली. न्यायमूर्तीपदाच्या काळात त्यांनी कायद्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. दिवाणी प्रक्रियेचा कायदा, पर्यावरण विषयक प्रकरणे हे त्याची उदाहरणे आहेत. वाड्:मयीन संस्था, साहित्य चळवळ, पत्रकारिता, शिक्षण संस्था या सर्व क्षेत्रांतील कामातही त्यांनी लक्ष घातले. निवडणूक कायदा आणि अन्न भेसळ कायदा या सबंधीची चपळगावकर यांची पुस्तके विशेष गाजली. स्वामी रामानंद तीर्थ यांचे विस्तृत चरित्रही त्यांनी लिहिले. स्वातंत्र्य संग्रामाची झलक, मानवी हक्क, पर्यावरण या विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
https://youtube.com/c/KESARINEWSPAPER या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा