मलिक यांचे आव्हान

मुंबई, (प्रतिनिधी) : कॉर्डिलिया क्रूझवरील कारवाईसंदर्भातील फुटेज अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जाहीर करावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी थेट एनसीबीला आव्हान दिले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नबाव मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आधी एनसीबीच्या पथकाबरोबर भाजपचे पदाधिकारीही सहभागी होते, असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर, एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यातील भाजपच्या एका नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी दूरध्वनी केल्यानंतर सोडण्यात आले, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. दरम्यान, एनसीबीने 14 जणांना ताब्यात घेतले होते; परंतु, चौकशीत काहीही न आढळल्याने सहा जणांना सोडण्यात आल्याचे मान्य करताना, मलिक यांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता मलिक यांनी एनसीबीला कारवाईबाबतचे फुटेज जाहीर करण्याची मागणी केली. तसेच, ज्या 14 जणांना ताब्यात घेतले होते; त्यातील उर्वरित तिघांची नावे जाहीर करावीत. तुमच्या कार्यालयातून ते लोक बाहेर पडतानाचे फुटेज जाहीर करा. भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर 3 जणांना सोडले आहे. ही सर्व कारवाई बनावट आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा