मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले. सीबीआयचे एकूण पाच ते सहा अधिकारी देशमुख यांच्या घरी पोहोचले. गेल्या दोन महिन्यांपासून अनिल देशमुख गायब आहेत. ते कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागत नाहीये.

आज सकाळी सात वाजता सीबीआयचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले. फक्त देशमुखच नाही तर त्यांच्या कुटुंबियांचाही पत्ता नाही. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसेच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.

या प्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात अर्जही केला होता. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात अर्ज करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.काही महिन्यांपूर्वी सीबीआयने देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजरही राहिले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा