पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, पान बाजार विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी बाजार आवारातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि उपाध्यक्ष अमोल घुले, युवराज काची यांनी दिली.
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि पान विभागातील सर्व व्यवहार बंद असणार आहे. त्यामुळे सोमवारी शेतकर्‍यांनी माल विक्रीस आणू नये. घाऊक ग्राहकांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन अमोल घुले यांनी यावेळी केले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला बाजार आवारातील आडत्यांप्रमाणेच कामगार, तोलणार, टेम्पो संघटनांकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक शनिवारी मार्केट यार्डातील शारदा गजानन मंदिरात पार पडली. यावेळी, सर्वानुमते बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली. दरम्यान, कामगार संघटनांच्या बैठकीत लखीमपूर येथील मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा