पुणे : ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते जलमय झाले. व्यवहार विस्कळीत झाले, तर वाहतूक ठप्प झाली. महत्वाच्या अनेक चौकांत साणी साचल्याने बहुतांश रस्त्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवरून पाणी वाहत होते. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने अक्षरश: झोडपले.
शहरात काल सकाळपासून ऊन पडले होते. दुपारी उकाडा वाढला होता. सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. ढगांचा गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाला सुरूवात झाल्या काही वेळातच बहुतांश रस्त्यांवरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. छोट्या रस्त्यांना नाल्याच्या स्वरूप आले. धुव्वाधार पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आहे, त्या ठिकाणी आडोशाला थांबावे लागले. वाहत्या पाण्यातून वाहन चालविणे अशक्य झाल्याने त्यांनाही वाहन कडेला लावून पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करावी लागली.
शनिवारच्या सुट्टीमुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मात्र पावसामुळे या सर्वांची गैरसोय झाली. तसेच रस्त्यांवर थांबून विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांना साहित्याची आवरा-आवर करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. पावसाला सुरूवात होताच रस्ते रिकामे झाले होते. जोरदार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. सुमारे 30 ते 40 मिनीट पाऊस पडल्यानंतर रात्री उशीरापर्यंत शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण कायम होते. पाऊस थांबल्यानंतर शहराच्या मध्यवस्तीत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा