पुणे : दक्षिण व मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह उर्वरित राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आणखी तीन ते चार दिवस हा पाऊस कायम असणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने पुन्हा राज्यात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याचे वादळात रूपांतर होणार आहे. हे वादळ येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत ओडिसा किनारपट्टीला धडकणार असल्याचा अंदाज आहे. या वादळाचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यात येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र या भागातील पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील चार दिवस या भागातील पाऊस कायम असणार आहे. राज्यातील घाट विभागातही पावसाचे सातत्य कायम असणार आहे.

पुण्यातही पावसाच्या सरी

पुणे आणि परिसरात सकाळी ऊन पडले होते. मात्र दुपारी आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागात जोरदार तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतरही ढगाळ वातावरण कायम होते. सायंकाळी पुन्हा शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत मात्र पावसाळी वातावरण कायम होते. जिल्ह्यातील घाट विभागात मात्र चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा