सुरक्षेच्या कारणामुळे अनेकांचे विमान चुकले

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आठवड्याच्या शेवटच्या दिवसांच्या सुट्ट्यांसाठी प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांना मोठ्या गोंधळाचा फटका बसला. अनेक प्रवाशांची उड्डाणे चुकल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. सकाळच्या उड्डाणासाठी तिकीट बुक केलेल्या अनेक प्रवाशांची उड्डाणे चुकली. टर्मिनल 2 येथे सुरू असलेल्या गोंधळामुळे विमानतळावर मोठ्या रांगांसह गर्दी पाहायला मिळाली. सुरक्षेच्या कारणामुळेच अनेक प्रवाशांना उड्डाणे मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

अनेक ठिकाणी सुरक्षा विभागाचे काऊंटर्स बंद झाल्यानेच अनेक प्रवाशांना बोर्डिंग गेट्सपर्यंत पोहोचता आले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता ही गर्दी उसळली असल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी हाताळण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा असल्यानेच विमानतळावर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थितीही निर्माण झाल्याचे ट्विट काही समाज माध्यम वापरकर्त्यांनी केले. महत्वाचे म्हणजे इतका गोंधळ होऊनही विमामतळाच्या अधिकार्‍यांकडून एकही स्पष्टीकरण किंवा ट्विट करण्यात आले नाही.

देशभरात सणासुदीचे दिवस सुरू असतानाच मुंबई विमानतळ मात्र ही गर्दी हाताळण्यासाठी तयार नसल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत गायक विशाल दादलानी यांनी संतप्त ट्विट केले, मशीन बंद पडत आहेत, गर्दी अनावर होत आहे आणि अशातच राग अनावर होतानाच सगळीकडे गोंधळच गोंधळ पहायला मिळत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा