लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी पुणे बंद
पुणे : लखमीपूर खेरी हत्याकांडाच्या निषेध करण्यासाठी तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धती विरूद्धतीला विरोध व संविधान वाचविण्याचा निर्धार करण्यासाठी येत्या सोमवारी पुणे बंद ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे.
संयुक्त बैठकीला शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार, आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी व कमल ढोले, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, माजी महापौर अंकुश काकडे, जनता दल शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आपचे संयोजक संदेश दिवेकर, राष्ट्र सेवादलाचे पदाधिकारी दत्ता पाकिरे, लोकायतचे नीरज जैन आदी 11उपस्थित होते.
बैठकीत लखीमपूर खेरी हत्याकांड तसेच केंद्र शासन करत असलेल्या शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग आणि विरोधकांवरची दडपशाही याचा निषेध करण्यात आला. हत्याकांडाबद्दल तसेच अन्नदात्याच्या मृत्यूविषयी देशाचे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने कोणी काही प्रतिक्रिया देत नाही याबद्दलही बैठकीत खेद व्यक्त करण्यात आला. लखीमपुर हत्याकांडाच्या निषेधाचा ठराव राज्य मंत्रिमंडळात करण्यात आला. या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदचे आवाहन राज्य सरकार मध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या राज्य प्रमुखांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बंदच्या तयारीसाठी आज (शनिवार) शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका ठरविण्यात आल्या. या बैठकांमध्ये कार्यकर्ते बंदचे नियोजन करतील. पुणे बंदमध्ये शहर बस वाहतूक, रिक्षा भुसार, भाजीपाला बाजार, पाथरी व्यवसायिक, इतर व्यावसायिक, आस्थापना इत्यादी सर्व ठिकाणी बंद पाळण्यात येईल तसे आवाहन संबंधितांना येत्या दोन दिवसांत करण्याचे ठरविण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा