पुणे : नवरात्रोत्सव आणि दसर्‍यामुळे नारळाला मोठी मागणी असते. यंदाही मागणी कायम आहे. मात्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात पाऊस सुरू आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी मागणी करूनही माल वेळेत मिळत नसल्याने मागणीच्या तुलनेत तुटवडा जाणवत आहे. परिणामी शेकड्याच्या दरात 150 ते 200 रूपयांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे दसर्‍यापर्यंत दर टिकून राहतील. असा अंदाज व्यापारी दीपक बोरा यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
एकीकडे नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे, तर दुसरीकडे मंदिरे, धार्मिक स्थळे खुले झाली आहेत. त्यामुळे विक्रेते तसेच ग्राहकांकडून विविध प्रकारच्या नारळाला मागणी वाढली आहे. मार्केटयार्डात तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून नारळाची आवक होते. तामिळनाडूमध्ये अद्यापही पाऊस थांबला नाही. तसेच या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणूका सुरू आहेत. परिणामी पावसामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. निवडणूकांमुळे कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मालाची मागणी करूनही वेळेत गाड्या पोहचत नाहीत. परिणामी नारळाचा बाजारात तुटवडा जाणवत असल्याचेही बोरा यांनी नमूद केले.
तामिळनाडू येथून येणार्‍या नव्या नारळाच्या दरात 150 ते 200 रूपयांनी वाढ झाली आहे. तर कर्नाटकातून येणार्‍या नारळाच्या दरात 50 ते 100 रूपयांनी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीमुळे हॉटेल, खानावळी, मिठाईवाले आदींकडून नारळाला मागणी कायम असणार आहे. त्यामुळे नारळाची आवक सुरळीत झाली तरी, मागणी असल्याने दर टिकून राहतील, असेही दीपक बोरा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा