कोल्हापूर : देवदवतांची आराधना, आरती सोहळे, दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना, उपवास यासह विविध धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलीत गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजा भवानी, अझाद चौकातील दत्तभिक्षालिंग, टेंबललाई, जोतिबा आणि नृसिंहवाडीतील दत्तात्रयांसह जिल्ह्यातील मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अंबाबाई मंदिरात परंपरेनुसार तोफेची सलामी देऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्याचे संकेत मिळाले. ऑनलाइन दर्शनास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. महाद्वारात मात्र दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

तुळजा भवानी मंदिरात घटस्थापना होऊन परंपरेनुसार बकर्‍याचा बळी देण्यात आला. या विधीनंतर चांदीच्या पालखीतून तुळजा भवानी अंबाबाईच्या भेटीसाठी बाहेर पडली. रात्री साडेनऊ वाजता नवरात्रौत्सवातील अंबाबाईचा पहिला पालखी सोहळा भक़्तांच्या गर्दीत आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

घटस्थापनेपूर्वी पहाटे पाचपासून ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ऑनलाइन बुकिंग न केलेल्या भाविकांना महाद्वारातून मुख दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

नवरात्रौत्सवाच्या काळातच भक्तांसाठी मंदिरे खुली करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय शिबिर सुरू करण्यात आले असून रुग्णवाहिकेचीदेखील सोय करण्यात आली आहे.

तीन तासांत 15 हजार भाविकांची नोंदणी

करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. याची नोंदणी बुधवारी सकाळपासून सुरू झाली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत 15 हजार भाविकांनी पाससाठी नोंदणी केली.

मंदिरात बॉम्बची अफवा

पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या दूरध्वनीमुळे काही काळ गोंधळ उडाला. दूरध्वनी करणार्‍याने अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार बॉम्बशोधक पथकाने तातडीने मंदिरात कसून तपासणी केली. यावेळी मंदिरात बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे बॉम्बची अफवाच असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला श्री अंबाबाईची ब्रह्मणी रूपात सालंकृतपणे अलंकार पूजा बांधण्यात आली. आजची पूजा चेतन चौधरी आणि लाभेश मुनिश्वर यांनी बांधली. (छाया : मालोजी केरकर)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा