दुबई : आयपीएल स्पर्धेत पंजाबने चेन्नईला 6 गडी आणि 6 षटके राखून पराभूत केले. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत 12 गुण झाले असून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी साखळी फेरीतील पंजाबचे सर्व सामने संपले असून कोलकाता आणि मुंबई यांचे प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना गमवल्यास कोलकाता, मुंबई, राजस्तान आणि पंजाबचे प्रत्येकी 12 गुण होतील आणि धावगतीवर चौथ्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होईल.

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 135 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी के एल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 46 धावांची भागीदारी केली. मात्र मयांक अग्रवाल वैयक्तिक 12 धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर लगेचच सरफराज खानच्या रुपाने पंजाबला दुसरा धक्का बसला. त्याला आपले खातेही खोलता आले नाही. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर फाफने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेला शाहरुख खानही मैदानावर तग धरू शकला नाही. 8 धावा करून तंबूत परतला. तीन गडी बाद झाल्यानंतरही कर्णधार केएल राहुलने एकट्याने किल्ला लढवला. त्याने या सीझनमधले सहावे अर्धशतक झळकावले. केएल राहुलने 42 चेंडूत 98 धावा केल्या. या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. एका बाजुला कर्णधार केएल राहुलची फटकेबाजी सुरु असताना चौथा गडी बाद झाला. एडन माक्रम 13 धावा करून बाद झाला.

चेन्नईच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या 18 धावा असताना पहिला गडी बाद झाला. ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला धक्का बसला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर शाहरूख खानने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराजने 14 चेंडूत 12 धावा केल्या. यात एका चौकाराचा समावेश आहे. त्यानंतर मोइन अलीही मैदानात जास्त तग धरू शकला नाही. त्याला आपले खाते खोलता आले नाही.त्यानंतर रॉबिन उथप्पाही कमाल करू शकला नाही. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रार याने त्याचा झेल घेतला. अंबाती रायडुही झटपट बाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर अर्शदीपने त्याचा झेल घेतला.

अंबाती रायडुने 5 चेंडूत 4 धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. धोनीने 15 चेंडूत 12 धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि रवींद्र जडेजाने चेन्नईचा डाव सावरला. फाफ याने 55 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. शमीच्या गोलंदाजीवर फटका मारताना झेल बाद झाला.

चेन्नईने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. पंजाबने आपल्या संघात एक बदल करत ख्रिस जॉर्डनला स्थान दिले आहे. पंजाब संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पंजाबचे गुणतालिकेत 13 सामन्यात 10 गुण आहेत. अशात सामना जिंकत शेवट गोड करण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे

चेन्नईचा संघ- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, मोइन अली, अंबाती रायडु, रॉबिन उथप्पा, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेझलवूड

पंजाबचा संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, एडेन मक्रम, सरफराज खान, शाहरूख खान, मोजेस हेनरिक, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंह

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा