‘पँडोरा पेपर्स’ने जागतिक भ्रष्टाचार, आर्थिक अफरातफर यावर नव्याने प्रकाश टाकला आहे. अति श्रीमंत व्यक्ती आणखी श्रीमंत होण्याचे मार्ग शोधतात. त्यांना कर व कायद्यांचे तज्ज्ञ मदत करतात हेही त्यातून दिसले.

तूर्त जगात ’पँडोरा पेपर्स’ नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रकरणाने खळबळ माजली आहे. जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींची जगाच्या विविध भागात दडवलेली संपत्ती,कर चुकवेगिरी किंवा कर भरण्याचे टाळणे यांचे अनेक प्रकार ’पँडोरा पेपर्स’ द्वारे जगाच्या समोर आले आहेत. यात पैसे बाहेर ठेवणे,या साध्या बाबीपासून आर्थिक गुन्हेगारांनी आपली संपत्ती कायद्याच्या कचाट्यापासून कशी वाचवली आहे, याचे तपशील आहेत. युरोप,अमेरिका,रशिया, जपान, पश्चिम आशिया,एवंच जगातील बहुतेक भागातील श्रीमंत त्यात गुंतल्याचे उघड झाले आहे. त्यात भारतीय देखील मागे नाहीत. हे प्रकरण शोधण्यासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख कागदपत्रे उघडकीस आणली गेली. 117 देशांतील 600पेक्षा जास्त पत्रकारांनी अनेक महिने या कागदपत्रांची छाननी केल्यावर त्यातील माहिती उघड करण्यास सुरुवात केली. अति श्रीमंत व्यक्तींना संपत्ती व्यवस्थापनाची सेवा पुरवणार्‍या व वित्त क्षेत्रातील अन्य संस्थांच्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यावर समोर आलेले सत्य थक्क करणारे आहे. मध्यंतरी ’पनामा पेपर्स’ व पॅराडाइज पेपर्स’ नामक प्रकरणांमधूनही असेच प्रकार उघड झाले होते. आता ’पँडोरा पेपर्स’ ने समोर आणलेल्या माहितीवर जगातील सरकारे काय कारवाई करणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

करचुकव्यांचे ’स्वर्ग’

अमेरिकेतील ’वॉशिंग्टन,मध्ये शोध पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची एक संस्था किंवा गट आहे. ’इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इन्व्हिस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस्’असे त्याचे नाव आहे. जगातील 140 माध्यमसंस्था त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. भारतातील एक इंग्रजी वृत्तपत्रही त्यात आहे. जगभरातील श्रीमंत व्यक्ती आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजत असतात. त्यापैकी अनेक सरकारांना माहित असतात. जेव्हा प्रकरण जास्त गंभीर होते तेव्हा सरकार कारवाई करते. आता उघड झालेली प्रकरणे अधिक किचकट आहेत. कारण बाहेर पाठवलेली सर्वच संपत्ती काळा पैसा आहे असे म्हणता येत नाही. हल्ली जगातील बहुतेक देश परदेशी व्यक्तींनी आपल्याकडे गुंतवणूक करावी या साठी आकर्षक योजना सादर करत आहेत. आपला मूळचा देश आणि परदेश येथील करविषयक नियमांचे पालन करून कोणी परदेशांत गुंतवणूक केली तर प्रश्न नसतो. भारतातही प्राप्तीकर विवरण पत्रात (इन्कम टॅक्स रिटर्न)परदेशात असलेली घरे,त्यापासून मिळणारे उत्पन्न जाहीर करण्यास एक कलम असते.मात्र जेव्हा भारतात एखादी व्यक्ती कायदेशीररीत्या दिवाळखोरी जाहीर करते त्याच व्यक्तीची परदेशात अब्जावधींची मालमत्ता असल्याचे स्पष्ट होते तेव्हा प्रश्न येतो. ’पँडोरा पेपर्स’मधून अशीच धक्कादायक माहिती उघड होत आहे. विविध देशांच्या कर व संपत्ती विषयक कायद्यांमधील पळवाटांचा फायदा घेत अनेकांनी अनेक देशांमध्ये विश्वस्त संस्था स्थापन केल्या, एका कंपनीत गुंतवणूक करणारी दुसरी कंपनी (होल्डिंग कंपनी) स्थापली. अनेक देशांमध्ये अशा संस्थांचे(स्ट्रक्चर) जाळे असल्याचे आता समोर येत आहे. अनेकांनी पैशाची अफरातफर करून तो पैसा अशा संस्थांकडे किंवा त्यांच्या मार्फत इतरत्र वळवला आहे. बेकायदा मार्गाने मिळवलेला,कर चुकवून जमा केलेला हा पैसा आहे. त्याची रक्कम अजून कळलेली नाही. लाखो कागदपत्रे,ई-मेल्स, छायाचित्रे यांची पडताळणी करून शोध पत्रकारांनी तुकड्या-तुकड्याने माहिती जमा केली,जोडली त्याचा अन्वयार्थ लावला आहे. पूर्वी सेंट किट्स,सेशेल्स आदी ’करचुकव्यांचे स्वर्ग’मानले जात.स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले जात. आता अमेरिकेतील साउथ डाकोटा हे राज्य त्यांचा नवा स्वर्ग ठरत असल्याचे दिसत आहे. भारतातील 300 व्यक्तींची नावे उघड झाली आहेत.त्यांची चौकशी करण्याचे प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले आहे.त्यातून हाती फार काही लागेल असे नाही. कारण सर्व व्यवहार बेकायदा असल्याचे सिद्ध करणे जिकिरीचे आहे.त्यांच्या ‘कदाचित’ कायदेशीर व्यवहारांमुळे देशाचा कोट्यवधींचा कर महसूल बुडतो. सामान्य,प्रामाणिक करदाते नागरिक महागाईचे चटके सोसत असताना अति श्रीमंतांच्या या ’लिळा’बघून ते संतप्त न झाले तर नवल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा