मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली. वैद्यकीय चाचणीनंतर रविवारी रात्री त्याला जिल्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली.

अमली पदार्थांची खरेदी, ते जवळ बाळगणे आणि त्याचे सेवन करणे, असे विविध आरोप आर्यनवर आहेत. प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयासमोर आर्यनची बाजू मांडली.

अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी एका क्रूझवर (मोठ्या जहाजातून) छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले होते.यामध्ये आर्यनसह मुनमुन धामेचा, नूपुर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोेकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश होता. अधिकार्‍यांनी कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ यावेळी जप्त केले होते.

मुंबईलगतच्या समुद्रात क्रूझवर छापा टाकत अधिकार्‍यांनी अमली पदार्थाच्या पार्टीचा भांडाफोड केला, अशी माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी माहिती दिली. या प्रकरणी एनसीबीने एफआयआर नोंदविला आहे, असेही ते म्हणाले.

या छाप्यात 8 जणांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आणखी काही छापे टाकले जातील, असे एनसीबीचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी सांगितले.

कार्डिला द इम्प्रेस या क्रूझवर ही पार्टी सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वानखेडे यांनी क्रूझवर छापा टाकत कारवाई केली. हे जहाज मुंबईहून गोव्याकडे निघाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले. काहींनी त्याचे सेवन केले होते. पार्टीतील बहुतांश तरुण दिल्लीचे असल्याचे चौकशीत समोर आले. एनसीबीचे अधिकारी साध्या वेशात जहाजावर उपस्थित होते. जहाजाने बंदर सोडल्यानंतर काही वेळाने पार्टीला सुरूवात झाली. पार्टी रंगात असताना अधिकार्‍यांनी कारवाईला सुरूवात केली. अंगझडतीत काहींकडे अमली पदार्थ आढळून आले. जहाज पुन्हा बंदराकडे वळवून संशयितांना एनसीबीच्या कार्यालयात आणले गले. रात्री उशिरा पाच जणांना सोडून देण्यात आले. तर, आर्यनसह अन्य दोघांची काल दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर, त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. या तिघांनाही एक दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलीवूडमधील अमली पदार्थांचे जाळे समोर आले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 33 जणांचे नाव समोर आले होते. सप्टेंबरमध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरावर तब्बल 3 हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा