पुणे : ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या प्रचंड कडकडाटात पुण्यात सोमवारी रात्री साडे सातच्या सुमारास अतिमुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या काळी वेळात बहुतांश रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले, तर काही भागात झाडे कोसळली. वीजांच्या कडकडाटामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. सुमारे तास दोन तास कोसळत होता आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. रस्त्यांवरून वाहणार्‍या पाण्यामुळे रात्री उशीरापर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. पाऊस थांबल्यानंतर मात्र अनेक रस्त्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रात्री आठपर्यंत शिवाजी नगर परिसरात 26.3, वडगावशेरी परिसरात 91, तर मगरपट्टा सिटीत 41.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. टिंगरेनगर, महर्षी नगर आणि गुलटेकडी परिसरात काही ठिकाणी झाडे पडली. कोरेगाव पार्क, गणेश पेठ, पुलगेट आणि साडे सतरा नळी आदी भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.
मध्य वस्तीतील सर्व पेठा, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा, बालाजीनगर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सातारा रस्ता, गोखले नगर, शिवाजीनगर, कॅम्प परिसर, येरवडा, मगरपट्टा सिटी, हडपसर परिसरात जोरदार पाऊस पडला. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मध्य वस्तीतील लहान रस्ते ओढ्याप्रमाणे वाहत होते. वीजांच्या कडकडाटासमुळे नागरिकांना घर, दुकाने तसेच कार्यालयांची दरवाजे बंद करून घ्यावी लागली.
पाऊस थांबल्यानंतरही रात्री उशीरापर्यंत अनेक रस्त्यांवर पाणी कायम होते. त्यामुळे चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नव्हता. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. वाहत्या पाण्यातून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
सायंकाळी ऐन कार्यालये सुटण्याच्या वेळेत पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांना आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. रात्री सवा आठपर्यंत मुसळधार पाऊस कायम होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा