करचुकवेगिरी करणार्‍यांच्या यादीत ३००हून अधिक भारतीय

वॉशिंग्टन : पाच वर्षांपूर्वी पनामा पेपरलीकने जगभरात खळबळ उडवली होती. बड्या व्यक्तींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून केलेली करचुकवेगिरी यामुळे समोर आली होती. आता पुन्हा एकदा ’इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स’ने (आयसीआयजे) ’पँडोरा पेपरलीक’द्वारे आतापर्यंतचा सर्वांत मोठा गौप्यस्फोट केला असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये हा गैरव्यवहार कशाप्रकारे करण्यात आला होता आणि हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी यावर कसा तोडगा काढायला सुरुवात केली याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगभरातून 119 कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा ’आर्थिक गैरव्यवहार’ जगासमोर उघड झाला आहे. 117 देशांतील 600 पत्रकार ’पँडोरा पेपर लीक’च्या तपासात सहभागी होते, असे ’आयसीआयजे’ने सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध अहवालानुसार, ब्रिटनच्या न्यायालयात आपण दिवाळखोर असल्याचा दावा करणार्‍या उद्योगपतींच्या परदेशात 18 कंपन्या आहेत. या यादीतील 300 पेक्षा जास्त भारतीय नावांपैकी 60 जणांविरुद्ध पुरावे तपासण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येत्या काही दिवसांत हे उघड होतील.

सचिन तेंडुलकरचा समावेश?

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचाही सहभाग असल्याचा दावा आयसीआयजे संस्थेने केला आहे. पनामा पेपरलीकनंतर अनेक भारतीयांनी आपल्या संपत्तीची नव्याने रचना करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये सचिनचाही समावेश आहे. सचिनने हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन महिन्यांमध्येच ब्रिटिश वर्जिन आयलँडमधील संपत्ती विकण्याचा प्रयत्न सुरू केला, अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. मात्र सचिनच्या वकिलाने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सचिनची सर्व गुंतवणूक कायदेशीर असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा