मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या संदर्भात राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अटकेच्या भीतीने परमबीर सिंग हे परदेशात गेल्याची चर्चा सुरू आहे.

परमबीर सिंग यांच्या रजेचा कालावधी संपूनही अद्याप ते कामावर रुजू झालेले नाहीत. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एनआयए) सुरू आहे. तसेच वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोरही ते हजर झालेले नाहीत. ते कुठे आहेत याची त्यांच्या निकटवर्तीयांनाही माहिती नाही. यामुळे ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस बजावण्यात आली असल्याने तेही तितकेसे सोपे नाही. सरकारी अधिकारी असल्याने त्यांना सरकारच्या परवानगी शिवाय परदेशात जाता येऊ शकत नाही.

त्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली असली तरी गृह खात्याने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. सरकार त्यांच्या निलंबनासंदर्भात सावध पावले उचलत आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच याबाबतची कार्यवाही सूरु होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा