झज्जर : हरयानामध्ये शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवार्‍याचा वापर केला. यावेळी पोलिस आणि आंदोलक शेतकर्‍यांमध्ये झटापटदेखील पाहायला मिळाली.

झज्जरमध्ये उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला एका कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र, त्यांना शेतकर्‍यांचे प्रश्न अथवा समस्या जाणून घेण्यात किंवा पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहण्यास साधा वेळ नसल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी होती. त्याचा विरोध म्हणून काल सकाळी मोठ्या संख्येत महिला आणि पुरूष आंदोलक हातात काळे झेंडे घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळाकडे निघाले होते. पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. त्यासाठी पोलिसांनी मार्गावर अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. या ठिकाणी पोलिस आणि शेतकर्‍यांमध्ये झटापट झाली. तसेच, मोठी धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवार्‍याचा वापर केला. चौका-चौकात मोठा पोलिस बंदोबस्त होता. धुमश्चक्रीचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी शेतकर्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले. लोकशाही मार्गाने विरोध अथवा निषेध व्यक्त करण्याचा आपणास अधिकार आहे, असेही पोलिस उपायुक्तांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा