मुंबई : यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी मुंबई महापालिकेने गुरुवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घातली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.

पालिकेने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पालिकेच्या सर्व मार्गदर्शक सूचना व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्व साहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमाना नुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

कोरोनाचे सर्व नियम पाळून सण साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केल्या आहे. तसेच गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही प्रसाद वाटप, जाहिराती या वरही बंदी घालण्यात आली आहे. यासह अन्यही सूचना करण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोर पालन करणे नागरिकांना बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

देवीचे आगमन आणि विसर्जनासाठी, तसेच मंडपात किती नागरिकांनी सहभागी व्हावे याबाबतही मर्यादा घालण्यात आली आहे. घरगुती मूर्तीच्या आगमन, विसर्जनासाठी पाच व्यक्ती तर सार्वजनिक मंडळासाठी १० जणांना उपस्थित राहता येणार आहे.

या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, तसेच दुसरी मात्रा घेऊन १५ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

नवरात्रोत्सवात कोणत्याही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गरब्याचा फेर धरता येणार नाही. दांडिया, भोंडलाही रंगणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा