पुणे : करार संपून चार महिने उलटले, तरी दरवाढ न झाल्याने हमाल पंचायतीतर्फे मार्केटयार्डातील दि पुना मर्चंटस् चेंबरच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. 2018 मध्ये ठरविण्यात आलेल्या हमाली दराची मुदत मे 2021 मध्ये संपली. त्यानंतर तब्बल चार महिने उलटूनही हमाली दरवाढीविषयी पुणे मर्चंट चेंबरने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. हमाल पंचायतीच्या दरवाढीच्या प्रस्तावावर केवळ चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे म्हणाले, कोणत्याही मालक आणि कामगार यांच्यातील दरवाढीच्या करारात साधारणता मागील करारापेक्षा अधिकची वाढ पुढील करारात होते. त्यानुसार 2018 -2021 या काळाकरता हमाल पंचायत आणि पुणे मर्चंट चेंबर यांनी जो करार केला. त्यात उतराई, काटा हमाली, वाहतूक अशा वेगवेगळ्या हमालीच्या कामासाठी सरसकट 25 टक्के हमाली दरवाढ देण्यात आली होती. मे 2021 मध्ये संपलेला करारानंतर आता 40 टक्के दरवाढ करावी अशी मागणी हमाल पंचायतने केली आहे. मात्र दरवर्षी सहा टक्केप्रमाणे तिसर्‍या वर्षात एकूण 18 टक्के एवढीच दरवाढ घ्यावी, यावर पुढे मर्चंट चेंबर अडून बसली आहे. याबाबत बाजार आवारात नियमन नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पंचायतीने दाद मागितली. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत समितीने 8 ऑक्टोबरला बैठक बोलवल्याचे कळवले आहे. एका बैठकीला एवढा वेळ लागला तर प्रश्न कसा सुटणार? म्हणून पंचायतीने उद्या (शनिवार) गांधी जयंतीच्या दिवशी पंचायतीच्या सभासदांची सभा घेण्याचे ठरविले आहे. या सभेत वस्तुस्थिती मांडून पुढील दिशा ठरविली जाणार आहे. धरणे आंदोलनात अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, तोलणार पतसंस्थेचे अध्यक्ष हनुमंत बहिरट यांनी मार्गदर्शन केले. हमाल पंचायतीचे पदाधिकारी चंद्रकांत मानकर, अंकुश आवताडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा