पुणे : दाबाचे क्षेत्र असलेली प्रणाली दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये सक्रिय होती. गुरूवारी ती अरबी समुद्राकडे जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील प्रणालीमुळे दोन दिवस उंच लाटा उसळणार आहेत. ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली भारतीय किनार्‍यापासून दूर पाकिस्तान आणि मकरान किनार्‍याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला या प्रणालीचा प्रभाव जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले.
‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकत आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहे. आज उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्वविदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज आणखी तीव्र होणार आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा