पुणे : श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपताच शहरातील खवय्यांकडून चिकनला मागणी वाढली आहे. अचानक मागणीत वाढ झाल्याने चिकनच्या किलोच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढले असले, तरी ग्राहकांकडून मागणी कायम आहे. त्यामुळे वाढलेले दर काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे जिल्हा बॉयलर ट्रेडर्स असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी बुधवारी व्यक्त केला.
श्रावण आणि गणेशोत्सवामुळे मागील दीड महिन्यांपासून चिकन, मटण, मासळीला फारशी मागणी नव्हती. रविवारी गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर खवय्यांकडून चिकन, मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी 200 रुपये किलो असलेल्या चिकनच्या दरात 40 रुपयांनी वाढ झाली आहे. नवरात्रौत्सवाचा प्रारंभ होईपर्यंत पुढील पंधरा दिवस चिकन, मटण, मासळीला खवय्यांकडून मागणी कायम राहणार आहे. इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर आहेत. वातावरणात गारवा वाढल्याने गावरान अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. मागणी असल्याने दरही टिकून राहणार असल्याचेही परदेशी यांनी नमूद केले.
विसर्जनानंतर दुसर्‍या दिवशी सोमवार होता. त्यामुळे अनेकजण नॉनव्हेज सेवन करत नाहीत. मात्र मंगळवारपासून मागणीत मोठी वाढ झाली आहे. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, ‘गणेशोत्सवानंतर मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. खवय्यांची पसंती सुरमई, रावस, पापलेट, हलवा या मासळीला आहे. खोल समुद्रातील मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. लहान आकाराच्या सुरमईच्या दरात घट झाली आहे. खोल समुद्र, नदी, तसेच खाडीतील मासळीची आवक चांगली होत आहे.
’मटणाच्या मागणीत वाढ झाली असून, उपाहारगृह, तसेच किरकोळ ग्राहकांकडून मटणाला मागणी चांगली असल्याचे पुणे शहर मटण विक्रेता दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा