अधिकार्‍यावर हल्ला निषेधार्ह

नुकताच ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर फेरीवाल्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. निश्चितच ही घटना निषेधार्ह अशी आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंगळे यांची हाताची दोन बोटे तुटली आहेत. तसेच त्यांच्या दुसर्‍या हाताला आणि डोक्याला मोठी जखम झाली आहे. कासारवढवली जंक्शन परिसर अनधिकृत आणि परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात व्यापला आहे. याचवेळी कारवाई करत असताना संतापलेल्या फेरीवाल्याने पिंगळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या दरम्यान त्यांचा अंगरक्षक मदतीला धावून आला होता. मात्र फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात त्याचं ही एक बोट तुटले आहे. खरचं या घटनेमुळे अधिकार्‍यांची असो अगर त्यांच्यावर होणार्‍या कारवाईची भितीचं नसल्यामुळे अशा घटनांना वाव मिळतो. अशा फेरीवाल्यांमागे सूत्रधार कोणीतरी वेगळाच असणार.

राजू जाधव, मांगूर (जि. बेळगांव)


मूर्तींमुळे जलप्रदूषण नाही
गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण असे गृहीत धरूनच अशास्त्रीय पद्धतीने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधले जातात. या हौदात मूर्तीविसर्जन करण्यासाठी आवाहन केले जाते. अनेक ठिकाणी हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती काढून पुन्हा त्या नदीतच टाकल्या जातात. गेल्या वर्षीपासून पालिकेने घरच्या घरी बादलीत मूर्ती विरघळवण्यासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही अमोनियम बायकार्बोनेट देण्याचे आदेश देण्यात आले असून, या रसायनाचा पुरवठा महापालिकेकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी, असे धर्मशास्त्र सांगते. अशा मूर्तींमुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच वाहत्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विर्सजन करावे, असे ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथात म्हटले आहे.
रामचंद्र लुगडे, पुणे.


शाडूची मूर्तीच योग्य
आजकाल शाडूच्या मूर्तीपेक्षा पीओपी च्या मूर्ती वजनाने हलक्या व अधिक सुबक असतात असे कारण सांगून पीओपीच्या मूर्तींना बरीचशी गणेशोत्सव मंडळे जास्त प्राधान्य देत आहेत. खरेतर पी.ओ.पी.ची मूर्ती बनवताना आधी ती मातीची बनवली जाते. नंतर त्यामध्ये पी.ओ.पी.चा वापर केला जातो. आणि शाडूच्या मूर्तीसुद्धा तितक्याच सुबक व रेखीव असतात. उलट शाडूच्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळत असल्यामुळे त्याने पर्यावरणाची कसलीही हानी होत नाही.
अपर्णा जगताप, पुणे.


जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे !
गतिरोधक, सीसीटीव्ही असे अनेक उपाय योजूनही किंबहुना प्रत्यक्ष वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावीत असतानाही कांही दोन चाकी, चार चाकी वाहनांचे चालक वाहतुकीचे सारे नियम गुंडाळून बेपर्वाईने, बेफिकीरपणे वाहन चालवताना दिसत असतात. स्वतःबरोबर दुसर्‍यांच्या जीवाचीही त्यांना फिकीर वाटत तर नाहीच, परंतु अशांंना कायद्याचा धाक अथवा भीतीही वाटत नाही. थोडीफार दंडात्मक कारवाई होईल आणि दंड भरला की झाले ही मानसिकताच आढळून येते. याच पार्श्वभूमीवर इंदूर (म.प्र.) येथील वाहतूक पोलिसांनी अशा नियम तोडणार्‍या चालकांना दंडात्मक कारवाई अथवा सजा न करता त्यांनाच त्याच क्षणी, त्याच जागेवर वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्याची योजना आखून एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करून यशस्वी केला. त्यामुळे प्रत्यक्ष नियम तोडणार्‍याला वाहतूक नियंत्रित करणे किती खडतर असते, नियम पाळणे किती गरजेचे आहे आणि आपण कसे चुकतोय याची जाणीव अशा प्रयोगातून निश्चितच जाणवेल.
विश्वनाथ पंडित, चिपळूण

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा