मुंबई :
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्याकडून मुंबईत रेकी करण्यात आलेली नाही. दहशतवादी जान महमद शेख याने मुंबईत रेकी केलेली नाही, अशी माहिती महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी दिली. जान महमद शेख हा मुंबईतील धारावी येथील रहिवासी आहे. तो गोल्डन टेम्पल रेल्वेने दिल्लीला गेला होता, अशीही माहिती अग्रवाल यांनी दिली.
दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणार्‍या जान महमद अली महमद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून मोठा गदारोळ राज्याच्या राजकीय वर्तुळात उडाला. विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करताना एटीएस झोपली होती का? असा सवाल केला. यामुळे आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी जान महमद शेखचे 20 वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.
दरम्यान, दहशतवादी जान महमद शेखकडून कोणतीही स्फोटके, शस्त्रे मिळाली नाहीत. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. जान महमदचे अंडर वर्ल्डबरोबर संबंध असल्याचे तपासात समोर येत असून कारवाईसाठी मुख्यंमत्री आणि गृह मंत्र्यांनी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, जान महमद हा धारावी येथील रहिवासी आहे. परदेशी नागरिक नाही. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसचे अपयशी ठरल्याची चर्चेचा संबंध नाही. जान महमद शेख त्याच्याविरोधात गोळीबार, शिवीगाळ, मारहाणीचे गुन्हे यापूर्वीच दाखल झाले आहेत. त्याचे 20 वर्षांपासून दाऊद टोळीसोबत संबंध होते. तो पोलिसांच्या निशाण्यावर होता. जान महमदवर कर्ज होते. आधी तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जावर टॅक्सी घेतली. त्याचे हफ्ते भरू न शकल्याने बँकेने टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर दुचाकी खरेदी केली. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा