काबूल ः अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार प्रस्थापित झाले असले तरी तेथील संघर्षमय वातावरण कायम आहे. महिला आंदोलन, तालिबानी हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आता अफगाणिस्तानमध्ये भारतीय व्यावसायिकाचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. अफगाण वंशाच्या भारतीय व्यावसायिकाचे अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. 
इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनती सिंह चंढोक म्हणाले की, काबूलमधील अफगाण वंशाच्या एका भारतीय व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण करण्यात आले. बंसरी लाल अरेन्देही असे या व्यावसायिकाचे नाव आहे. बंसरी शीख समुदायाचे आहेत; पण अजूनपर्यंत त्यांचे अपहरण नक्की कोणी केले, हे स्पष्ट झाले नाही. परंतु, तालिबान्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.
चंढोक यांनी सांगितले की, 50 वर्षांचे बंसरी यांचे काबूलमध्ये औषध उत्पादनाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या दुकानाजवळून त्यांचे अपहरण करण्यात आले. बंसरीसोबत त्यांच्या कर्मचा़र्‍यांचेही अपहरण झाले. परंतु, त्या लोकांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला. या कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.
चंढोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंसरी यांचे कुटुंबीय दिल्ली-एनसीआरमध्ये राहत आहेत. स्थानिक तपास यंत्रणेने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे आणि त्यांचा शोध केला जात आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली असून सरकारला याप्रकरणी तत्काळ हस्तक्षेप आणि सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा