अहमदाबाद : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या बहुतेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक या पुरात अडकले आहेत. रस्ते जलमय झाले असून अनेक गाड्या वाहून गेल्या,  तसेच अनेक घरे  पाण्यात अडकली असून लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. बचाव कार्यासाठी  हेलिकॉप्टरचीही मदत घ्यावी लागत आहे. 
गुजरातच्या जामनगर, राजकोट, जुनागडला पावसाने झोडपून काढले. जामनगरमध्ये तब्बल 35 गावांचा संपर्क तुटला असून या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. एनडीआरएफची सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच हवाई दलाच्या 4 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. कित्येक भागांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. पुरापासून वाचण्यासाठी अनेकांनी घरांच्या छतांवर आसरा घेतला आहे. पावसामुळे अनेक नद्या आपले पात्र सोडून वाहत आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. नद्यांची वाढलेली पाणी पातळी पाहता अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
राजकोटमध्येही परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागांत पूर आला आहे. त्यामुळे दोरीच्या मदतीने पुरात फसलेल्या लोकांची सुटका केली जात आहे. जामनगर, जुनागढ, पोरबंदर, द्वारका, ओखा आणि राजकोटमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक भागात वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा