काबूल : तालिबानने बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानात सत्ता मिळवली असली तरी त्यांना सरकार चालवणे अवघड होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. तालिबान मंत्रिमंडळात आता फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालिबानमध्येच सत्तेसाठी संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कतारसोबच्या महत्वाच्या बैठकीक़डे एका मंत्र्याने पाठ फिरविली. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
नवीन तालिबान सरकारच्या घोषणेला काही दिवस उलटले नाहीत, तोच त्यांच्यात मतभेद दिसू लागले आहेत. तालिबान सरकारमधील फूट दिसून येत आहे. कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांच्या काबूल भेटीदरम्यान उपपंतप्रधान मुल्ला बरदार आणि उप परराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास यांनी पाठ फिरवल्याचीच जास्त चर्चा सुरू आहे. हक्कानी नेटवर्कचा सरकारमध्ये दबदबा वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तालिबानचे प्रभावी नेते नाराज आहेत. ही तालिबान सरकारमधील सत्ता संघर्षाची सुरुवात मानली जात आहे.
सरकार स्थापनेनंतर तालिबानचे मंत्रिमंडळ ज्या देशांकडून मदतीची आशा बाळगते त्यांच्याशी चर्चा करत आहे. वॉन्टेड दहशतवादी आता जागतिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. हा दहशतवादी देश उभारणीबद्दल बोलत आहेत. पण या चर्चेत तालिबानचे असे काही चेहरे नसण्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. तालिबानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांचे नाव नव्हते. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
बैठकीत मुल्ला बरादरच्या अनुपस्थितीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना तालिबानने म्हटले की, मुल्ला बरादर अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये आहेत. बरदार तालिबानच्या प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी गेले आहेत आणि हेब्तुल्लाह अखुंदजादाच्या चर्चेमुळे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पण तालिबानच्या या स्पष्टीकरणानंतरही तालिबानमध्ये फूट पडल्याची चर्चा थांबली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा