संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

जीवनविद्येचा एक क्रांतीकारक सिध्दांत आहेे तो असा परमेश्‍वर हा 100 टक्के आहेच पण परमेश्‍वराबद्दलचे अज्ञान हे आपल्याच नव्हे तर जगाच्या दुःखाचे कारण आहे. सुख पहाता जवापाडे दुःख पर्वताएवढे हे जे सांगितले जाते तेव्हा आमचे म्हणणे असे आहे की संसार हे दुःखाचे कारण नाही. संसार दुःखमूळ चोहींकडे इंगळ हयाचा संबंध आहे तो परमेश्‍वराबद्दलच्या अज्ञानाशी आहे. परमेश्‍वराबद्दलचे ज्ञान झाले तरयथार्थ ज्ञान होणे शक्यच नाही. तो जसा आहे तसा आपल्याला कधी कळणार नाही. आतापर्यंत तो कुणाला कळलेला नाही व यापुढे तो कुणाला कळणार नाही कारण परमेश्‍वराचे स्वरूप अगाध आहे. त्याची निर्मिती अगाध आहे. तो स्वतः अनंत आहे, त्याचे ज्ञान अनंत आहे, त्याचे रूप अनंत आहे. किंबहूना त्याचे सगळेच अनंत आहे. याचा अर्थ असा त्याला आदी नाही व अंतही नाही. असा हा परमेश्‍वर आतापर्यंत कुणाला जसा आहे तसा समजलेला नाही, यापुढे समजणार नाही. यथार्थ ज्ञान जरी त्याच्याबद्दल आपल्याला समजले नाही तरी आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे जरी जाणून घेतले तरी हे जग सुखी होईल. परमेश्‍वराबद्दलचे यथार्थ ज्ञान जरी कुणाला होणार नाही हे जरी खरे असले तरी बरेचसे ज्ञान आपल्याला होवू शकते व हे ज्ञान झाले तरी हे जग सुखी होवू शकते. आज जगांत सर्व ठिकाणी दुःख आहे व किती दुःख? प्रचंड दुःख. प्रत्येक ठिकाणी दुःख आहे. प्रत्येक घरांत महाभारत, मारामारी, एकमेकांना दुःख देणे, अपमान करणे, त्रास देणे, छळ करणे हया गोष्टी चाललेल्या असतात. कोण सत्‍तेसाठी, कोण पैशासाठी, कोण प्रॉपर्टीसाठी हे करत असतो. कुठल्याही कारणासाठी कुणी सुखी नाही. एक म्हण आहे, नापुती रडे, एक पुती रडे, सातपुती तीही रडे म्हणजे मूल नाही म्हणून रड, एक मूल आहे म्हणून रड, सात मुले आहेत तरी रड अशी जगांत रडारड चाललेली आहे. पैसे आहेत तरी रड, सत्‍ता आहे तरी रड व प्रतिष्ठा आहे तरी रड, सर्व काही व्यवस्थित आहे तरी रड हे का घडते? माणसाचे मन हे हाव व धाव हयांत अडकलेले आहे. हाव व धाव हयांत माणसाचे मन सँडविच झालेले आहे. सतत त्याला काहीतरी पाहिजे असते. कशाच्यातरी पाठी ते सतत धावत असते. हाव नको का? धाव नको का? हाव नको म्हटले तरी ती असणारच कारण का ज्याला आपण कामना, इच्छा, अभिलाषा म्हणतो त्या शेवटपर्यंत रहाणारच. हयाचे कारण त्या प्रेरणा आहेत. त्यामुळेच हाव रहाणारच. ती कधीही संपणार नाही. धावही आपल्याला करायला पाहिजे मात्र ती कशासाठीही करतो तेव्हा घोटाळा होतो.
(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा