काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्यानंतर येथील परिस्थिती बिघडली आहे. त्या परिस्थितीत अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदतीची तयारी भारताने दाखवली आहे. संयुक्त राष्ट्रांनी मदत पुरवण्याच्या प्रस्तावाचे भारताने समर्थन केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुन्हा मदतीचा हात दिला आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. याआधीही अफगाणिस्तानला भारताने मदत केली आहे आणि आता ज्याप्रकारे अफगाणिस्तानात गंभीर परिस्थिती तयार झाली आहे, या गंभीर काळात भारत अफगाणी नागरिकांना मदतीस इच्छुक आहे असे जयशंकर यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गट्रेस यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा परिषदेची बैठक झाली. यात अफगाणिस्तानच्या प्रस्तावावर जयशंकर बोलत होते.
दरम्यान, भारताने अफगाणी नागरिकांच्या मदतीसाठी हात दिला असला तरी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत तालिबानला पुरवणार नसल्याचे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राने तालिबान सरकारने गैरकृत्य केल्यास, कडक पावले उचलावी आणि तालिबानवर आंतरराष्ट्रीय दबाव राहू द्यावा यासाठी भारताने पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.
तालिबान सरकार येण्याआधीच भारताने अफगाणिस्तानात हजारो कोटींची गुंतवणूक करुन ठेवली आहे. अफगाणिस्तानातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं चाभार बंदर भारताने विकसित केलं आहे. अफगाणिस्तानातील नद्यांवर धरणे उभी केली आहेत. तिथे सिंचनासाठी सोयी केल्या आहेत. मात्र, तालिबान सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर ही सगळी गुंतवणूक धोक्यात आली आहे. त्यामुळे तालिबानी सरकारशी भारताचे संबंध कसे राहतात, त्यावर या गुंतवणुकीचे भविष्य अवलंबून असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा