नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेकडून महिनाअखेरपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधात्मक लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरास परवानगी दिली तर, भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लस निर्यात करू शकेल आणि ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासदेखील सुलभ होईल. यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे भारत बायोटेकने जुलै महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविली आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच हिरवा कंदील मिळू शकतो, असे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत अमेरिकेच्या फायझर, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन, आणि मॉडर्ना, चीनच्या सायनोफॉर्म आणि ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेन्काच्या लशींना आपत्पकालीन वापरास मंजुरी दिली आहे. भारताने सहा लशींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. ही लस संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा