संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै
एकनाथ महाराजांनी चिंतनाचे महत्व एका अभंगांत सांगितलेले आहे, अवघेची त्रेलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित् ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन एकाजनार्दनी एकपणी उभा, चैतन्याची शोभा शोभवित चिंतन कुणाचे करायचे, नेमके चिंतन कसे करायचे हे या अभंगांत सांगितलेले आहे. अवघेची त्रेलोक्य आनंदाचे आता, आता हा शब्द वापरलेला आहे. चरणी जगन्नाथा देवाच्या चरणांवर चित्‍त ठेवतो तेव्हा! चरणांवर चित्‍त ठेवतो म्हणजे काय करतो? नामावर चित्‍त ठेवतो. नामावर एकदा चित्‍त बसले की तुमचे काम झाले. मी नाम म्हणतो तेव्हा प्रार्थना आली. आपले मन नामावर बसते का? आपण विठ्ठल विठ्ठल म्हणेपर्यंत मन कुठे गेलेले असते ते आपल्याला कळतही नाही. मन एका बाजूला व नाम दुसर्‍या बाजूला अशी परिस्थिती होते. मनाला एक गोष्ट ठावूक असते की आपले मरण तिथे आहे. आपण नामावर बसलो की आपले मरण तिथेच आहे म्हणून ते नामावर बसायला तयार होत नाही. एखादा निखारा असतो त्या निखार्‍याच्याजवळ माशी फिरकत सुध्दा नाही. माशीला माहित असते की आपण निखार्‍याच्याजवळ गेलो तरी आपण मेलो. हे उपजत ज्ञान त्यांच्याठिकाणी असते. निखार्‍याजवळ गेलो की मरणार म्हणून ती आजूबाजूला फिरकत सुध्दा नाही. तसे मन नामावर बसत नाही कारण मनाला ठावूक आहे की आपण नामावर बसलो की मन हे मन उरत नाही तर ते उन्मन होते. उन्मनीच्या सुखांआत पांडुरंग भेटी देत. मनाचे उन्मन होते पण मन मेल्याशिवाय मनाचे उन्मन कसे होणार? तेव्हाच खरे परिवर्तन होते. बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथा याचा अर्थ नामरूपाने विठ्ठल माझ्या जिभेवर बसला अशी अवस्था होते तेव्हा परिवर्तन होते. यासाठी नामाची गोडी लागली पाहिजे. नामावर प्रेम बसले पाहिजे. नामाचा छंद लागला पाहिजे. हा छंद लागला की सर्वांगीण प्रगती होत जाते. हे कशावरून? अनुभवावरून. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो आहे. मी इथपर्यंत आहे ते नामामुळे. मी नामस्मरण किती केले याची तुम्हांला कल्पनाही येणार नाही. अजूनही मी नामस्मरण करतो. नामाचा अनुभव मी घेतला म्हणून त्याचे महत्व मी सांगतो आहे. मी रामकृष्ण कामतांचे नामजपाचे महत्व हे पुस्तक वाचले व नाम घ्यायला सुरवात केली. नाम घेवून आपले नुकसान तर काहीच नाही मग आपण नाम का घेवू नये असा विचार केला व नामस्मरण करायला सुरवात केली. नामस्मरण करता करता प्रगती होत गेली व इथपर्यंत आलो. मात्र ते वाटते तितके सोपे नाही. जगांत जे जे चांगले आहे ते सोपे नसते. संत नामस्मरण करायला सांगतात कारण त्याने तुमचा उध्दार होईल, तुम्ही सुखी व्हाल.
(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा