पुणे ः साधारणपणे चौथ्या शतकापासून भारतामध्ये गणपतीची विविध शिल्पे आढळून येत आहेत. प्रत्येक ठिकाणी गणपतीच्या शिल्पाची रचना आणि आकार हा बदललेला आढळून येत असल्याचे दीपक कन्नल यांनी सांगितले. तसेच, भारताच्या प्रत्येक भागामध्ये गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला कायमच पहिल्या पूजेचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे, देवांमध्येही प्रथम असल्याचा मान गणपतीला असल्याचे कन्नल यांनी नमूद केले.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणेशोत्सवात यंदा ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयोजित ऑनलाइन केसरी गणेशोत्सवात रविवारी ‘आशिया खंडातील गणेश शिल्पे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कन्नन यांनी आशिया खंडातील विविध गणपतींची मंदिरे आणि त्याची अनेक रूपे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवली. यामध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, जावा, जपान, व्हिएतनाम या देशातील गणपतीच्या मंदिरांचे आणि शिल्पांचे त्यांनी वर्णन केले.
कन्नल म्हणाले, अष्टविनायकाची रूपे ही गणपतीची हुबेहूब रूपे नाहीत. पण निसर्गाशी समरूप असणार्‍यांमधील ही रूपे आहेत. तसेच, गणपती अथर्वशीर्षामध्ये गणपतीचे ज्याप्रमाणे वर्णन केले आहे, ते सर्व अष्टविनायक गणपतींमध्ये दिसून येते. तसेच, दक्षिण व उत्तर भारतामध्ये गणेशाची रूपे पाहिल्यास गणपतीची पूजा ही एकाच काळामध्ये सुरू झाल्याचे दिसून येते. अनेक चलन, वास्तू आणि शिल्पांमध्ये गणपतीची रूपे पुरातन काळी असल्याचे दिसून येते. काही उत्खननांमध्ये सापडलेल्या चौथ्या व पाचव्या शतकातील चलनांवर गणपती व नंदीचे चित्र असल्याचे आढळून आले आहे.
गणपतीच्या मूर्तीर्ंंमध्ये काळानुरूप झालेला बदल कन्नल यांनी यावेळी सांगितला. उत्खननामध्ये सापडलेल्या पुरातनमूर्तींमध्ये गणपतीला दोनच हात होते आणि वाहन असलेला उंदीर हा दिसेलच असे नाही. मात्र, त्यानंतर कदंब ते चालुक्य आणि चालुक्य ते वल्लम यांच्या काळात आणि त्यानंतर प्रत्येक गणपतीच्या मूर्तीला चार हात असल्याचे आढळून आले. त्यानंतर, अकराव्या शतकानंतर मूर्तीच्या शेजारीच उंदीर असल्याचे दिसून आले आहे.
सहाव्या शतकामध्ये गणपतीची कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात पूजा केली जात होती. बदामी येथील लेण्यांमध्ये अनेक ठिकाणी शंकराच्या सोबत गणेशाची शिल्पे आढळतात. तसेच, नटराजाच्या प्रत्येक शिल्पासोबत गणेशाचे शिल्प आढळते. याचाच अर्थ गणपती कलांचा अधिपती असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात वेरूळ येथील लेण्यांमध्ये शिव आणि पार्वती यांच्या विवाहसोहळ्याचे शिल्प सापडते. या शिल्पामध्ये विवाहाच्या वेळी एका ठिकाणी गणेशाची एक मूर्ती आढळते. त्यामुळे गणपतीचे अस्तित्व त्यांच्या विवाहापूर्वीपासूनच आहे किंवा नाही, याबाबत अभ्यास केला असता, गणपतीच्या अस्तित्वाच्या अनेक कथा पुराणांमध्ये सापडतात. याच लेणीमध्ये एका गुहेत महिषासुरमर्दिनी आणि गणपती यांची शिल्पे शेजारी शेजारी असल्याचे आढळतात. मात्र, या दोन्ही शिल्पांमध्ये जवळपास शंभर वर्षांचे अंतर असल्याचे जाणकार सांगतात. खजुराहो येथे गणेशाच्या दोन नृत्य करणार्‍या मुर्त्या आढळतात. यामध्ये त्यांच्या शरीराची रचना वेगळ्या पद्धतीची दिसते. केसरी गणेशोत्सवातील दीपक कन्नल यांच्या व्याख्यानाला श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ऑनलाइन केसरी गणेशोत्सवाचे कार्यक्रम पाहण्यासाठी https://youtube.com/c/KESARINEWSPAPER या लिंकवर पाहावे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा