नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. ते 8़0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
जुलै महिन्यात घरात योगासने करताना ते तोल जाऊन पडले होते. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. काल त्यांची प्राणज्योत मालवली.
फर्नांडिस हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात रस्ते आणि वाहतूक मंत्री होते. काँग्रेसच्या अखिल भारतीय निवडणूक समितीचे अध्यक्ष होते. तसेच, काँग्रेसचे माजी सरचिटणीस होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते राजीव गांधीचे संसदीय सचिव होते.
फर्नांडिस यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात 1970 मध्ये झाली. 1980 मध्ये कर्नाटकाच्या उड्डपी मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेसाठी निवडून गेले. त्यानंतर, 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये ते याच मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर ते राज्यसभेवर निवडून आले. ’ब्रदर ऑस्कर’ या नावाने ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी दोन वेळा कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा