कोरोना आणि संसर्ग तसेच लशीकरण आणि संभाव्य तिसरी लाट याबद्दल चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेले दीड वर्षे कोरोनाचा प्रभाव, भीती आणि दडपण असताना तसेच त्यामुळे विकासाला खीळ बसली असताना त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न चहूबाजूंनी झाले आहेत आणि होत आहेत. याबद्दल मागील लेखात आपण नोंद घेतली आहे. आता त्यापुढे जात परिस्थितीत आणखी बदल होत असल्याचे संकेत सर्व स्तरावर मिळत आहेत. उदाहरणार्थ, देशातील औद्योगिक उत्पादन जुलैमध्ये 11.5 टक्क्यांनी वाढल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने दिली आहे.
गेल्यावर्षी औद्योगिक उत्पादनात 10.5 टक्के घट नोंदवण्यात आली होती. या जुलै महिन्यात उत्पादन क्षेत्रात 10.5 टक्के वाढ झाली आहे. खाण उत्पादनात 19.5 टक्के आणि वीज निर्मिती क्षेत्रात 11.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जुलै या दरम्यान औद्योगिक उत्पादनाची वाढ 34.1 टक्के नोंदवली गेली आहे. अर्थव्यवस्थेसाठी ही सकारात्मक बाब आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला असल्याचे वृत्त आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. उपचाराधीन दोन रुग्णही बरे होऊन घरी गेले आहेत. गणरायाच्या आगमनासोबत या दोन सकारात्मक बातम्या आल्या आहेत. त्यामुळे त्यांची नोंद घेणे अगत्याचे आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सकारात्मक वार्ता आत्मबल वाढीस सहाय्यभूत ठरतात.
या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत विमान, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क न वापरल्यास केला जाणारा दंड रुपये 500 वरून 1000 डॉलर करण्यात आला आहे. दुसर्‍यांदा विनामास्क पकडल्यास तीन हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेत लशीकरणाला विरोध करण्यासाठी नागरिक मोठया संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. कोरोनामुळे जीवाला धोका असतानासुध्दा अमेरिकेत लोकांना स्वातंत्र्यावर बंधने आणि मास्क आणि लस नको आहे. भारतातील लोकांच्या लशीकरणाचा आकडा वाढत असताना अमेरिकेसारख्या एका महासत्तेच्या नागरिकांचे लसविरोधात सार्वजनिक निषेध वर्तन अशोभनीय आहे. आपल्या देशात कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्वतः पंतप्रधान उच्चस्तरीय बैठक घेऊन लशीकरण कामाचा आणि संभाव्य तिसर्‍या लाटेविरोधातील तयारीचा आढावा घेत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी 6.88 लाख आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि हा आकडा 8 लाख होईल असा अंदाज आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा अनुभव जमेस धरून देश कोरोनाविरुद्धच्या लढाईत सज्ज होत असल्याचे शासन आणि प्रशासनाच्या कृतीवरून दिसते.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34 हजार 973 रुग्ण आढळून आले आहेत. तर 37 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 7.7 टक्के घट झाली आहे. नव्या बधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा मोठा आहे. सध्या देशात 3 लाख 90 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यात केरळमधील 2 लाख 36 हजार 903 रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात 51 हजार 364 आणि कर्नाटकात 17 हजार 19, तामिळनाडूत 16 हजार 221 आणि आंध्रप्रदेशात 14 हजार 624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण बळींची संख्या 4 लाख 42 हजार 9 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.49 टक्के आहे. मृत्युदर 1.33 टक्के आहे. सध्या रुग्णसंख्या वाढीचा आठवडयाचा दर 2.31 टक्के आहे. दैनंदिन दर हा 1.96 टक्के आहे. देशाचा दररोजचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा 40 हजार आणि निरंतर खाली येऊन 30 हजाराच्या दिशेने अग्रेसर होत आहे. हे संसर्ग घटत चालल्याचे निदर्शक आहे. वाढते लशीकरण, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगच्या वापरामुळे हे शक्य झाले आहे, किंवा हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. पण रुग्णसंख्या कमी होत आहे हे नक्की.
कोरोनाच्या संसर्गाची भौगोलिक व्याप्तीही म्हणजे हॉटस्पॉटची संख्याही आता आक्रसत चालली आहे. जुन महिन्याच्या अखेरीस 100 रुग्ण दिवसाला निदर्शनास येणार्‍या जिल्ह्यांची संख्या 108 होती. जुलैच्या अखेरीस ही संख्या 58 झाली. आणि आता ऑगस्ट अखेरीस ही संख्या 38 झाली आहे. सप्ताहाचा पॉझिटीव्ही दर सातत्याने खाली येत असून आता तो 3 टक्क्याच्या आसपास घुटमळत आहे. एकूण 35 जिल्हे ज्यात केरळातील अधिक जिल्हे आहेत ते आणि हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यात अजूनही पॉझिटीव्ही दर 10 टक्क्यांच्या वर आहे. 30 जिल्हयात पॉझिटीव्ही दर हा 5 ते 10 टक्के आहे. दुर्दैवाने देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त हे केरळातील आहेत. केरळने बकरीदसमयी खूप हलगर्जीपणा दाखवला आणि त्याची मोठी किंमत चुकवली. त्यापासून धडा घेत ओणम सणादरम्यान केरळातील लोकांनी संयम बाळगला होता. त्यामुळे आता तिथे संसर्गाची आकडेवारी कमी होत चालली आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यानंतर नवरात्र आहे. सणासुदीला लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. कोरोना हाताळण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे केरळचे जे हाल झाले आहेत ते सर्वांनी पाहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी यापुढे सण साजरे करताना कोरोना प्रोटोकॉलचे कटाक्षाने पालन करायला हवे.
कोरोना संसर्गाचा काळ
सणांचा काळ सुरु झाला आहे. आणि हाच गर्दीचा आणि संसर्ग पसरण्याचा धोक्याचा समय असतो. म्हणूनच केंद्र शासनानेसुध्दा देशातील सर्वांनी लसची पहिली मात्रा घेतलेली असेल, हे पाहिले पाहिजे असे राज्यांना आणि जनतेलाही सांगितले आहे. लशीकरणाचा वेग त्यासाठी वाढवावा लागणार आहे. 58 ते 60 टक्के लोकांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली आहे. लस न घेतलेल्यांनी पुढे येऊन लशीकरण मोहीम सर्वांपर्यंत पोहचवण्यास हातभार लावावा, असे केंद्र शासनाचे सांगणे आहे. हे न केवळ लशीकरण 100 टक्के पूर्ण होण्यासाठी आहे. परंतू सर्व नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे. लशीची एक मात्रा ही कोरोनामुळे मृत्युच्या धोक्यावर जवळपास 97 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी याबाबत भाष्य केले आहे. लस परिणामकारक आहेच. पण लसमुळे रुग्णालयात दाखल आणि विविध उपचार यापासून बचावही होतो. कोविड व्हॅक्सीन ट्रॅकरव्दारे प्राप्त आणि छाननी केलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. हा ट्रॅकर देशभर लागू केला जाणार आहे. या ट्रॅकरव्दारे लशीकरणानंतर होणारा पुनर्संसर्ग आणि लशीकरण झालेल्या समुहात कोरोनाची घुसखोरी यावर लक्ष ठेवले जाणार आहे. सदर ट्रॅकरवर एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणातून कोविड लसची पहिली मात्रा ही मृत्यू रोखण्यास 96.6 टक्के परिणामकारक असल्याचे आणि दोन्ही मात्रा मिळून 97.5 टक्के संरक्षण प्राप्त होत असल्याचे दिसून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक बलराम भार्गव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लशीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव क्षीण होतो. कोरोना गंभीर रूप धारण करू शकत नाही. लस मृत्युला रोखते. कोरोना संसर्गाला अटकाव करत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू हा लस घेतलेल्यांच्यात घूसखोरी करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे लस घेतली म्हणजे सर्व काही झाले, असे नसून त्यानंतरही आरोग्य आणि वर्तन त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य आहे. डॉ भार्गव यांना यावर भर दिला आहे. ट्रॅकरने कोविन आणि आरोग्य मंत्रालयाच्या कोविड – 19 इंडिया पोर्टलवरील माहितीचे संकलन करून लशीकरणाच्या कामाचा आलेख नोंदवला आहे. त्या माहितीनुसार सर्व वयोगटातील नागरिकांना लस तेवढीच परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ भार्गव यांनी माहितीतून हे दाखवून दिले आहे. तथापि लशीकरणाचा वेग हे आपल्यापुढील हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात लसच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची टक्केवारी ही फक्त 19 आहे. राज्यातील 36 पैकी 21 जिल्ह्यात त्यांच्या लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांना दोन्ही लस मात्रा मिळालेल्या आहेत. हे खरोखर चिंताजनक आहे.
निष्काळजीपणा
आपण आपल्या इथे लस एक मात्रा संख्या 75 कोटीच्या पलीकडे जात असल्याचे समाधान मानून, पुढील काम करत आहोत आणि डिसेंबर अखेर संपूर्ण लोकसंख्येचे लशीकरण पूर्ण होईल, अशी आशा बाळगून आहोत. खंडप्राय अशा आणि अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात लशीकरण आणि संसर्ग रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. अमेरिकेत डेल्टा व्हॅरीयंटमुळे आणि जनतेच्या लशीकरण मोहीमेला प्रतिसाद न देण्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन कोरोनाविरुध्द लढाईचा एक सहा कलमी कार्यक्रम जाहीर करणार आहेत. तिकडे ब्रिटनमध्ये फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांना बुस्टर डोस म्हणून वापरण्यास तेथील मेडिकल रेग्युलेटरव्दारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या महिन्यात तिथे बुस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. सर्व प्रौढांना आणि ज्यांना कोरोना होण्याची शक्यता आहे, अशा सर्वांना सरसकट बुस्टर डोस द्यावा की नाही, याबाबत अद्याप तिथे निर्णय झालेला नाही. ब्रिटनच्या लस आणि रोगप्रतिकारशक्ती सहसमितीने याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. बुस्टर डोस देण्याबाबत मात्र तिथे पूर्ण तयारी करण्यात आली आहे. म्हणजेच ब्रिटनसारखे पुढारलेले देश दोन्ही लस मात्रा पूर्ण करून आता बुस्टर डोसच्या तयारीला लागलेले असताना आपण मात्र अजून संपूर्ण लसीकरण वेगाने करू शकलेलो नाही. तरीही दोष लावणे, तक्रार करणे हे टाळून लसीकरण मोहीमेस सर्वांनी हातभार लावायला हवा.
आपण केरळचे कोरोना लाटेत झालेले हाल पाहिले आहेत. आपण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या मध्यातच आहोत असे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक म्हणताहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीशी चांगली नाही. मुंबई आणि पुणे प्रादेशिक विभागातील जिल्हे कोरोनाग्रस्त आहेत. तिथे रुग्णसंख्या दुर्लक्षकरण्याजोगी नाही. सणासुदीच्या काळात लोकांनी अधिकधिक काळजी घ्यायला हवी. संभाव्य तिसरी लाट येईल की नाही, हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. कारण लाट स्वतःहून येत नाही. आपल्या निष्काळजीपणामुळे आणि बेपर्वावृत्तीमुळे संसर्ग फैलावतो. आपण हे अनुभवले आहे. प्रश्न आहे, तो आपण यापासून बोध काय घेणार आहोत ? केरळसारखी आपली परिस्थिती होऊ नये, यासाठी आपण काळजी घेत आहोत. संभाव्य तिसर्‍या लाटेविरुध्द तयारीही करत आहोत. कारण सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी आपण सर्वांनी अखंड सावध राहण्याची गरज आहे.
संभाव्य तिसर्‍या लाटेच्या सामन्यासाठी महाराष्ट्राने रुग्णालयात साडेसहा लाख खाटा, त्यात सव्वालाख ऑक्सिजन खाटा, 50 हजार आयसीयु, व्हेन्टिलेटर खाटा, ऑक्सिजन निर्मितीचे 450 प्रकल्प, दिवसाला तीन लाख नागरिकांच्या तपासणीची सोय, स्वॅब तपासणीसाठी 625 प्रयोगशाळा अशी ही संपूर्ण यंत्रणा उभारली आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयांनी मिळून हे काम तडीस नेले आहे. कारण सध्या कोरोना नियंत्रणात असला आणि तिसरी लाट येवो अथवा न येवो, पण आपण सर्वांनी अखंड सावध राहण्याची गरज आहे. तेव्हा जनहो गणेशोत्सव आणि त्यानंतर पितृपक्ष सावधपणे साजरा करा आणि लशीकरणास हातभार लावून आणि कोरोना प्रोटोकॉल पाळून पुढे नवरात्र आणि दिवाळीही आनंदात आणि उत्साहात साजरी होईल अशी तयारी करा, हेच आजचे सांगणे आहे. गणपती बाप्पा आपणा सर्वांना लशीकरण जागृती आणि वर्तन तसेच आरोग्य त्रिसूत्रीचे पालन करण्याची अखंड सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा