गुजरातमधील मुख्यमंत्री पदाचा पेच लवकर सोडवण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची नेतेपदी एकमताने निवड झाली. विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा अचानक राजीनामा देऊन सर्वांना चकित केले होते. कदाचित इतरांना वाटते तसे ते ’अचानक’ घडलेही नसावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या दिवशी अहमदाबाद मध्ये होते त्याच दिवशी रुपाणी यांनी राजीनामा देणे हा निव्वळ योगायोग असेल असेही नाही. पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर त्या कार्यक्रमात रुपाणी यांचे भाषणही झाले होते. त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. याचा अर्थ पदत्यागाचा हा निर्णय त्यांचा नसून, पक्षाचा आहे असे दिसते. गेल्या चार महिन्यांत भाजपचे पाच मुख्यमंत्री बदलले गेले. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी पद गमावले. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंग रावत यांची जागा तीरथ सिंग रावत यांनी घेतली; पण चार महिन्यांत त्यांनाही पद सोडावे लागले, कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांची खुर्ची गेली, आता विजय रुपाणी यांचा क्रमांक आला आहे.
खरे कारण गुलदस्त्यात
रुपाणी यांनी राजीनामा दिला की द्यावा लागला, त्याचे कारण काय? हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेस तोंड देण्यात त्यांचे प्रशासन व नेतृत्व अपयशी ठरल्याची टीका होत होती. गुजरात उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला अनेकदा धारेवर धरले होते. गेल्या काही महिन्यांत प्रदेश भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात आले. रुपाणी यांना दूर करण्याच्या हिशेबाने ते बदल झाले असावेत, असा तर्क आता मांडला जात आहे. गेल्या वर्षी प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी सी. आर. पाटील यांची नेमणूक करण्यात आली. ते पटेल समाजाचे आहेत व कट्टर मोदी समर्थक आहेत. त्यांना अमित शहा यांचाही पाठिंबा आहे. इतरही काही पदाधिकारी बदलले गेले. मनसुख मांडवीय व परशोत्तम रुपाला यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली. हे दोघेही मोदी समर्थक मानले जातात. रुपाणी यांच्या जागी एकास आणण्याची ही पूर्वतयारी असावी असे तेव्हा राज्यात बोलले जात होते. मात्र, रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरा जाऊ शकत नाही याची पक्षश्रेष्ठांची खात्री पटल्याने त्यांना बदलण्यात आले, असे भाजपमधून मत व्यक्त होत आहे. मोदी व शहा यांच्याखेरीज या पक्षात ’श्रेष्ठ’ आहे कोण? त्यामुळे हा निर्णय दोघांनी घेतला असणार असे मानता येते. राज्यात सलग सातव्या वेळी सत्तेत येण्याची भाजपची आकांक्षा आहे; पण ते फार सोपे नाही. गेल्या निवडणुकीपूर्वी आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला व रुपाणी मुख्यमंत्री झाले. निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या, 2012च्या तुलनेत पक्षाने 16 जागा गमावल्या होत्या. नंतर काँग्रेसचे आमदार फोडून त्यांनी आपले संख्याबळ वाढवले, तसेच पोटनिवडणुकीत त्यांना यश मिळाल्याने आमदारांची संख्या 112 वर गेली. कोरोनामुळे आता परिस्थिती बदलली आहे. या साथीत तेथे 10 हजारांपेक्षा जास्त जणांना प्राण गमवावे लागले. त्यात प्राणवायू अभावी मरण पावणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यावरूनच रुपाणी सरकारवर टीकेची चौफेर झोड उठली होती. पाच वर्षांपूर्वी पाटीदारांचे राखीव जागांच्या मागणीसाठी आंदोलन जोरात होते. अजूनही हा समाज भाजपवर नाराज आहे. पुढील निवडणुकीत तो कोणाकडे झुकेल अद्याप स्पष्ट नाही. आपल्या समाजास मुख्यमंत्रिपद मिळावे ही पाटीदारांची मागणी आता भूपेंद्र यांच्या रूपाने काही अंशी पूर्ण झाली आहे. भाजपत राज्यात गटबाजी नसेलच असेही मानता येत नाही. गुजरातच्या जनतेतील भाजपबद्दलची नाराजी कमी करणे व पुढील निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देणे, असे अवघड आव्हान भूपेंद्र पटेल यांच्यापुढे आहे. काँग्रेस बरोबरच ’आप’ला रोखण्याची जबाबदारीही त्यांच्यापुढे आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात ते लवकरच दिसेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा