न्यूयॉर्क : रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याचबरोबर मेदवेदेवने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
21 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याच्या आशेने मैदानात उतरलेल्या जोकोविच सामन्याच्या सुरुवातीपासूनच लयीत दिसला नाही. त्याने सलग तीन सेट (6-4, 6-4, 6-4) गमावले.
या वर्षाच्या सुरुवातीला, मेदवेदेवन ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जेथे नोव्हाक जोकोविचने त्याला जेतेपद जिंकण्यापासून रोखले. आता वर्षाच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये डॅनिल मेदवेदेवने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धे जेतेपद जिंकून नोव्हाक जोकोविचला इतिहास रचण्यापासून रोखले.
जर नोव्हाक जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा हा अंतिम सामना जिंकला असता तर तो पुरुषांमध्ये सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू ठरला असता, पण रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने, जोकोविचचे स्वप्न भंगवले. सध्या, नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम जिंकून संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत.
कॅलेंडर स्लॅमचे स्वप्न अपूर्ण
जोकोविचने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा, फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. जर त्याने अमेरिकन खुली स्पर्धा जिंकली असती, तर तो एका वर्षात सर्व चार ग्रँडस्लॅम जिंकणारा, म्हणजेच कॅलेंडर स्लॅम जिंकणारा खेळाडू ठरला असता. आतापर्यंत रॉड लेव्हरने पुरुषांमध्ये वर्षभरात चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. लेव्हरने 1962 आणि 1969 मध्ये ही कामगिरी केली होती. त्याच वेळी, महिलांमध्ये स्टेफी ग्राफने 1988 साली हा विक्रम तिच्या नावावर केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा