काबूल ः अफगाणिस्तानातील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर खोर्‍याच्या मोठ्या भागावर तालिबानने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानकडून बंडखोरांना पाठिंबा देणार्‍या लोकांना लक्ष्य केले जात आहे. माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबान्यांनी निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता पंजशीर खोर्‍यातून तालिबानचा प्रतिकार करणारा अहमद मसूदही पंजशीर सोडून तुर्कस्तानात पळून गेल्याचे माहिती समोर येत होती. त्यानंतर आता अहमद मसूद अद्याप अफगाणिस्तानातच असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजशीरच्या 70 टक्के मुख्य भागांवर आता तालिबानचे नियंत्रण आहे. अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद तुर्कस्तानात किंवा इतर कोणत्याही देशात पळून गेल्याच्या केवळ अफवा आहेत. मसूद अफगाणिस्तानातच सुरक्षित ठिकाणी आहे, असे सांगितले जात आहे. तालिबानने गेल्या आठवड्यात आतापर्यंत अजिंक्य असलेल्या पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तालिबानचा मुकाबला करणार्‍या बंडखोर लष्कराने राष्ट्रीय विरोध आघाडीने (एनआरएफ) हा दावा फेटाळला. एनआरएफचे नेतृत्व अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह करत आहेत. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा