पुणे : भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये शिव, शक्‍ती, गणपती, सूर्य व विष्णू या पाच देवता प्रधान मानल्या जातात. याला पुराणात पंचायतन संबोधले गेले असून हिंदु धर्म संस्कृतीत विखुरलेल्या समाजाला एकत्र बांधण्याचे काम या ‘पंचायतन’ने केले, असे प्रतिपादन प्रणव गोखले यांनी केले. पुराणातील गणेश जन्माच्या विविध कथांतील गणेश माहात्म्य उदाहरणासह यावेळी त्यांनी उलगडले.
केसरी गणेशोत्सवाच्या प्रथेप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील पहिले पुष्प प्रणव गोखले यांच्या, ’पुराणातील गणेश’ या व्याख्यानाने गुंफले गेले.
प्रणव गोखले म्हणाले, काळानुसार पुराण संहिता बदलत गेल्याने पुराण कथांमध्ये काही घटत गेले, तर काही वाढत गेले. यामुळे विविध पुराणांत गणेश जन्माच्या विविध कथा पााहायला मिळतात. यामध्ये प्रांतवारही वेगवेगळया कथा पुराणात आढळत असल्याचे दाखले गोखले यांनी यावेळी दिले. मुख्यत्वे गणेश पुराण, मुद‍्गल पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराणातील विविध कथांवरून गणपतींचे आठ अवतार व नावे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रासह अनेक भागांत गणेश जन्माच्या कथेचा उल्लेख, पार्वती देवी अंघोळीला जाताना तिच्या मळापासून बालक तयार केला व त्याला संजीवनी देऊन द्वाररक्षणाचे काम दिले. महादेव आले असता त्यांना प्रवेश न दिल्याने शिर उडविले. नंतर त्याला हत्तीचे मुख लावल्याने त्याला गजमुख, असा आढळतो. काश्मीरमध्ये गणेश जन्माची कथा ही माता पार्वती यांची दासी मालिनी यांनी पार्वती मातेचे रजस्राव धारण करून दोघींच्या रजातून गणेशाचा जन्म झाला म्हणून द्वैवमातूर, असे नाव असल्याचा उल्‍लेख पुराणात आढळत असल्याचे गोखले यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा