पुणे : पुण्यातील गणेशोत्साची ख्याती जगभरात आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या देशात वास्तव्याला असणारी मंडळीही मनोभावे गणेशोत्सव साजरा करतात. जगभरात कार्यरत असणारी मराठी मंडळेही विनाखंड गणेशोत्सवाची परंपरा चालवित आहेत. त्यात तैवान येथील मराठी मंडळही मागे नाही. कोरोनामुळे निर्बंध लागू असतानाही गणेशोत्सवाच्या परंपरेत खंड नको म्हणून हे मंडळ यंदा ऑनलाइन गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे देशाप्रमाणे विदेशातही ऑनलाइन गणेशोत्सव रंगत आहे.
तैवान येथे सन 2015 पासून मराठी मंडळ कार्यरत आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, नगर, नांदेड येथील 100 पेक्षा अधिक तरूण, तरूणी शिक्षण आणि नोकरीनिमित्त तैवानमधील विविध शहरात वास्तव्याला आहेत. गणेशोत्सवानिमित्त हे सर्वजण एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा कोरोना आणि निर्बंधामुळे प्रत्यक्ष गणेशोत्सव साजरा करणे या मंडळाला शक्य झाले नाही. त्यामुळे या मंडळाने ऑनलाइन गणेशोत्सव सुरू केला आहे. प्रत्यक्ष भेटता आले नसले, तरी या मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य रोज झूमद्वारे रोजच ऑनलाइन भेटतात आणि उत्सवासंदर्भात चर्चा करतात. तैवानमधील पंडित आंब्रे, बालाजी बर्वे, संदीप वाघ, संजय मदने, रोहन पाष्टे, पूनम बोराडे, शुभम नवले, अतुल लांजेवार, धैर्यशील चेंडके, स्वप्निल गुजराती, सयाजी मोरे, रेवण कट्टे, कृष्णा बोराडे, बालाजी काळे, रामेश्वर स्वामी, वरद मोडक, महेश गाडेकर आदींनी ऑनलाइन गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.
या मंडळातर्फे गणेशोत्सवाप्रमाणे शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन, शिवजयंती, रक्षाबंधन, गणेशोत्सव, वटपौर्णिमा आदी सण मराठी परंपरेनुसार साजरे केले जातात. तैवानमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मराठी मंडळी नोकरी आणि शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. सणासुदीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येत सहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गप्पाटप्पांचा आनंद लुटतात. मराठी मंडळ तैवानतर्फे मागील महिन्यात स्वातंत्र्य दिन तैपेई येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणारा हा आनंदोत्सव तैवानमध्येही मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात साजर्‍या केल्या जाणार्‍या सण, उत्सव, समारंभ तैवानमध्ये साजरे करून मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पताका तेथेही फडकत ठेवली आहे.
निर्बंधामुळे ऑनलाइन गणेशोत्सव
कोरोना संसर्गाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारताप्रमाणेच तैवाण येथेही निर्बंध कायम आहेत. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव ऑनलाइन घेण्याचा निर्णय तैवान येथील मराठी मंडळाने घेतला. त्यानुसार ऑनलाइन उत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवात विशेष ऑनलाइन व्याख्याने पार पडणार आहेत. त्यात प्रसिद्ध ग्रामीण कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, प्रा. राजेश पाटील आज (रविवारी) व्याख्यान देणार आहेत. हे व्याख्यान यू ट्यूबवर ऐकता येणार आहेत.

संकटकाळी महाराष्ट्राला मदतीचा हात
देशापासून दूर असले, तरी सामाजिक बांधिलकी बाळगण्यात तैवान येथील मराठी मंडळ आघाडीवर आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकटे कोसळली, त्या वेळी मदत करून खारीचा वाटा उचलण्याचे काम या मंडळाने केले आहे. 2019 आणि 2021 मध्ये पूरग्रस्तांना मराठी मंडळाने आर्थिक मदत केली आहे. या मंडळातील सर्व मंडळी महाराष्ट्रीयन असल्याने या सदस्यांना कायम मातृभूमीची ओढ असल्याचे या मंडळाचे सदस्य पंडीत आंब्रे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा