पुणे : गणेशोत्सव आणि गौराई म्हटले की, विविध प्रकारच्या फुलांची सजावट आलीच. त्यामुळे विक्रेते, गणेश मंडळे आणि ग्राहकांकडून विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत फुलांची आवक होत आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. गौराईमुळे फुलांच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. परिणामी आज (रविवार) आणि उद्या (सोमवारी) फुलांच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. असा अंदाज व्यापारी सागर भोसले यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच सुकलेला झेंडू आणि सजावटीच्या फुलांना दरही चांगला मिळत असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे फुले भिजली आहेत. बाजारात विक्रीसाठी येणार्‍या फुलांत भिजलेल्या फुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे झेंडूच्या भिजलेल्या फुलांना 10 ते 25 रूपये दर मिळत आहे. तर सुकलेल्या मध्यम दर्जाच्या फुलांना 30 ते 60 रूपये, तर अतिचांगल्या प्रतीच्या फुलांना 80 ते 100 रूपयापर्यंत भाव मिळत आहे. मात्र अति चांगल्या प्रतीच्या फुलांचे प्रमाण कमी आहे. मागणी असल्याने चांगल्या प्रतीच्या सर्व फुलांची विक्री होत असल्याचे भोसले यांनी नमूद केले.
भोसले म्हणाले, झेंडूसह जर्बेरा, कर्नोशियन, आर्केट फुलांनाही ग्राहकांकडून मागणी होत आहे. आणखी दोन दिवस सजावटीच्या फुलांना मागणी कायम असणार आहे. झेंडूच्या फुलांची आवक पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. तसेच कर्नाटकातून काही प्रमाणात आवक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत फुलक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत फुलांना निम्माच दर मिळत आहे. गौराईमुळे फुलांची आवक आणखी वाढणार असल्याचे सागर भोसले यांनी सांगितले.
लागवड क्षेत्र वाढल्याने दरात घट
मागील वर्षी लॉकडाऊन होते. त्यामुळे अनेक मर्यादा होत्या. बाजार सुरू राहतील की बंद याबाबत शेतकर्‍यांच्या मनात प्रश्न होता. त्यामुळे लागवड क्षेत्रात मोठी घट झाली होती. परिणामी बाजारात फुलांची आवक घटली होती. फुलांना चांगला दर मिळाला होता. मात्र यावेळी कोरोना असला, तरी बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी फुलांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ केली. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बाजारात फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांच्या दरात तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे विभागासह कर्नाटकातून झेंडूच्या फुलांची आवक होत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
जुई, चमेली आठशे रूपये किलो
गणेशोत्सव आणि गौरी आगमनानिमित्त दरवर्षी सजावट आणि सुंगधी फुलांना विक्रेते आणि ग्राहकांकडून मागणी वाढत असते. यंदाही या फुलांना वाढली आहे. त्यामुळे जुई आणि चमेली या फुलांना घाऊक बाजारात प्रतिकिलोला 800 रूपये दर मिळाला. मागणीच्या तुलनेत या फुलांना आवक खुपच कमी होत आहे. त्यामुळे दर अधिक आहेत. या फुलांची पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरातून आवक होत आहे. गणेशोत्सव आणि गौराईमुळे या फुलांचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात अधिकच असणार आहेत.-अरूण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशन.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा