विद्यावाचस्पती विद्यानंद
पैसा हे साधन असल्याची जाणीव होणे जरुरीचे असते; परंतु तो साधन न राहता साध्य होऊ लागते तेव्हा त्या साधनाच्या आधीन, कालांतराने स्वाधीन होण्यास प्रारंभ होतो. त्या साधन प्राप्तीसाठी सर्वस्व विसरून जाऊन स्वतःला देखील त्या साधनांच्या स्वाधीन केले जात असल्याचे अनेकदा दिसते. सुरुवातीला आधीन होणारा, तर काहीवेळा लाचार झालेला देखील दिसून येत असतो. त्याच्यासाठी पैसा हे साधन न राहता ते साध्य ठरू लागते. स्वाधीन होणारी व्यक्ती इतकी गाफील असते की, त्या व्यक्तीला पैशाची लालसा निर्माण झाल्याचीही जाणीव होत नसते. आधीन होणारी व्यक्ती मुळातच अधीर झालेली असल्याचे स्पष्ट होत असते. आपल्याला जे साध्य करायचे आहे, ते कधी एकदा आपल्याला प्राप्त होणार, असे झालेले असते.
साधन साधण्यासाठी निश्चितच योग्य मार्ग अवलंबणे महत्वाचे असते. पैसा किती मिळाला, याची पेक्षा, तो कसा मिळवला ही बाब महत्वाची असते. अवैधरीत्या मिळवलेल्या पैशाचे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मूल्यमापन कायदेशीररीत्या केले जात असते. काही वेळा हम करे सो कायदा, अशा प्रकारे झुंडशाहीचा, गुंडगिरीचा, दडपशाहीचा वापर करून दबावाच्या तंत्राने मिळवलेला पैसा समाजाला, कायद्याला मान्य नसल्याची देखील जाणीव अनेकांना राहिलेली नसल्याचे दिसून येते. पैसा हे साधन असल्याचे माहिती असूनही ते साधण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडून, बंधने झुगारून, अनैतिकतेला कवटाळून काहीही करण्यात आपलेच कतृत्व श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याची धडपड सुरु असल्याचे देखील बघायला मिळते.
आपल्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसा हेच साधन असते. त्या साधनाशिवाय आपल्या गरजा भागवणे अशक्य असते. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गरजांप्रमाणे अर्थार्जन ही देखील अत्यंत महत्वाची गरज असल्याचे आपण प्रत्येकजण जाणतो. अर्थार्जन करणे म्हणजेच पैसा मिळवणे, साधनाची प्राप्ती करणे होय. ह्या साधनातून सधनता देखील प्राप्त करणे सद्य:स्थितीत जरुरीचे झाले आहे. वर्तमानातील आपल्या गरजा भागवणे जसे जरुरीचे असते, तसेच नजीकच्या भविष्याची देखील आर्थिक पातळीवर तरतूद करणे गरजेचे असते. साधनाच्या माध्यमातून सधनता प्राप्त होणे ही निश्चितच काळाची गरज आहे; पण साधनच साध्य समजणार्‍या व्यक्तीला त्याची जाणीव रहात नाही. साधन प्राप्तीमध्ये साधक आणि बाधक काय हे जाणून न घेण्याचीच उणिव त्यांच्यामध्ये असल्याचे दिसून येते.
साधनाला साध्य समजणारे हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते केवळ संधीसाधू असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. साधन प्राप्तीचा फायदा मिळवणे आणि प्राप्त परिस्थितीचा गैरफायदा घेणे यांतील फरक न समजण्याचीच उणीव अशा संधीसाधूंमध्ये असल्याचे अनेकदा दिसते. पैसा मिळवण्याची प्रत्येक संधी मिळवणे, त्या संधीचे सोने करणे हे निश्चितच योग्य ठरू शकते; परंतु एखाद्याचे नुकसान करून, फसवणूक करून, दबावतंत्राचा वापर करून पैसा मिळवणे कुकर्तुत्वाचे लक्षण मानावे लागेल. या संधीसाधूंमध्ये सर्व प्रकारची कामे करणारे दलाल, अडवणूक करून पैसा उकळणारे, हर तर्‍हेच्या कामासाठी वारेमाप पैसा उकळून स्वतःचे उखळ पांढरे करणारे काही संख्येने कमी नाहीत. आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक पातळीवर पिडलेल्या, अडलेल्यांना अंधश्रद्धेच्या भूल थापांची भुरळ पाडून आपल्या मोहजालात ओढणारे आणि साधनाला साध्य करण्यासाठी आर्थिक पिळवणूक करणारे संधीसाधू देखील संख्येने कमी नाहीत; पण सुज्ञ व्यक्तीला देखील फसवणुकीची जाणीव होत नाही.
आपल्या सधनतेचा गैरफायदा तर कोणी घेत नाही ना? ह्याची जाणीव प्रत्येकाला असतेच; परंतु तरी देखील भावनिक पातळीवर मैत्रीचे, नात्याचे, प्रेमाचे संबंध प्रस्थापित करून आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक बाबतीत इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना देखील अलीकडच्या काळांत मोठ्या प्रमाणांत उघड होत चालल्या आहेत. आर्थिक व्यवहार होत राहतो तोपर्यंत तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशी परिस्थिती असते. कालांतराने व्यवहार खंडित झाला की, इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरु होते. याबाबतीत संबंधीताचा हेतू झटपट श्रीमंत होऊन सधनता साधण्याचा असल्याचे अनेकांना समजू शकत नाही. त्यामुळे इमोशनल ब्लॅकमेलिंग होण्याची वेळ येऊ दिली जाते. या प्रकारे जेव्हा गैरफायदा घेतला जातो, तेव्हा काही अंशी चुकीच्या गोष्टी घडल्या असण्याची शक्यता असते. इमोशनमध्ये आडकायला असे काय भाग पाडत असते? दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या समस्येचा गांभीर्याने विचार होणे जरुरीचे आहे.
सद्य:स्थितीत सोशल मीडिया, स्मार्टफोन, मोबाईल नेटवर्क यामुळे जनसंपर्क खूपच जलद होऊ लागला आहे. तंत्रज्ञान, संगणकीकरण, आधुनिकीकरण याचा परिणाम जनमाणसावर प्रचंड प्रमाणत झाला आहे. याचा जितका उपयोग, फायदा होऊ लागला आहे, तितकाच त्याचा तोटा, नुकसान, फसवणूक होण्याचे प्रमाणही खूपच वाढत चालले असल्याचे आपण अनुभवत आहोत. या फसवणुकीच्या घटनांमुळे आपल्यापैकी किती जण सावध होतात? किती सतर्क राहतात? सुशिक्षित व्यक्तीच यामध्ये मोठ्या रकमेच्या फसवणुकीच्या बळी पडल्याच्या घटना सतत घडत राहतात. झटपट श्रीमंती हा त्या घटनांच्या मागील उद्देश असतो. यांत बळी पडलेली आणि फसवणूक करणारी व्यक्ती यांना परिणामांची जाणीव नसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असूनही आपण सावध न झाल्यामुळे सावज होत आहोत, त्याचे बळी पडत आहोत. फेसबुकच्या माधमातून मैत्री करून आर्थिक फसवणूक, प्रत्यक्ष भेटून मानसिक आणि शारीरिक शोषण, अत्याचार घडत असल्याचे सातत्याने आपण ऐकत, वाचत असतो. काहीवेळा तर काही जणांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागल्याचे उघड झाले आहे. फसवणूक होईपर्यंत व्यक्ती गाफील राहताना दिसतात.
आपल्या साधनालाच आपले साध्य समजू लागलेल्या प्रत्येकाचा विचार, वर्तन आणि व्यवहार अभ्यासला तर असे लक्षांत येईल की, केवळ पैसा मिळवणे हेच उद्दिष्ट त्यांचे असते. तो कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने, किती हुशारीने, कष्टाने, किती इमानदारीने मिळवला याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे खेदजनक चित्र अनेक ठिकाणी अनेकांच्या बाबतीत दिसून येत आहे. आपल्याला काय आणि किती हवे आहे, याची देखील जाणीव असणे जरुरीचे आहे. आपल्या पै पै जमवलेल्या पैशाचे मोल आपण घेतलेल्या मेहनतीच्या दृष्टिकोनातून खूपच मोठे असते. त्यामुळे कमावलेल्या प्रत्येक पैशाची काळजी घेणे, तो सांभाळणे, आर्थिक पातळीवर आपली फसवणूक न होऊ देणे, अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्वाचे आहे. त्यासाठी आपण नेहमीच सजग आणि सतर्क राहणे जरुरीचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा