संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै
चिंतन हा चिंतामणी आहे; पण तुम्ही चिंतन कुणाचे करणार? भूताचे चिंतन केलेत तर भूत व्हाल. काही माणसे भूताच्याच गोष्टी वाचतात, भूताच्याच गोष्टी ऐकतात, भूताच्याच गोष्टी बोलतात आणि मग तो टॉयलेटला जायलासुद्धा घाबरतो इतका त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. याचे कारण तुम्ही ऐकले काय, वाचले काय, बोललात काय या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चिंतन भूताचे कराल भूत व्हाल. चिंतन देवाचे कराल देव व्हाल. चिंतन पैशाचे कराल पैसेवाले व्हाल म्हणजे श्रीमंत व्हाल. या सर्व गोष्टी तुम्हांला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर चिंतन महत्त्वाचे आहे. संतांनी देवाचे चिंतन करायला सांगितले कारण एकदा देव तुमच्या हातात आला की बाकी सर्व गोष्टी तुमच्या हातात येतील. माणसाची शेंडी हातात आली की माणूस हातात आला. आता लोक शेंडीच ठेवत नाहीत. नामदेव महाराज म्हणतात नाम तुझी शेंडी आमुच्या हाती. सद्गुरू मार्गदर्शनाने, सद्गुरुकृपेने ही शेंडी म्हणजे नाम तुमच्या हातात आले की देवच तुमच्या हातात येतो. जनाबाईचा अभंग आहे प्रेमसूत्र दोरी नेतो तिथे जातो हरी. चिंतन देवाचे करायचे. देवाचे चिंतन केले की देव व्हाल. देव झालात की सर्व सुखे मागे येती लोटांगणी. सर्व सुखे तुमच्या दारांत उभी राहतील. चिंतन देवाचे करायचे म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जपा याचे दोन अर्थ आहेत. जपा म्हणजे जप करणे व दुसरा अर्थ जपून ठेवणे. नाम तुमच्या अंतःकरणांत जपा. नाम तुमच्या मनांत जपा. नाम तुमच्या हृदयांत जपा. एखादी गोष्ट जपून ठेवतो म्हणजे ती हरवणार नाही याची काळजी घेतो. आपल्यापासून दूर होणार नाही याची काळजी घेतो. त्याला आपण चिकटून राहिले पाहिजे. नामाला आपण चिकटून राहिले पाहिजे. अट्टहासे नाम घेता घेता काय झाले ते नामदेव महाराज सांगतात बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथा माझी जिव्हा विठ्ठल नाम घेता. ज्ञानेश्‍वर महाराज हेच थोड्या वेगळया शब्दांत सांगतात. ते म्हणतात, जयाचिये वाचे पुढा भोजे, नाम नाचतसे माझे जे जन्मसहस्री वोळगीजे, एक वेळ यावया हजार जन्मीचे पुण्य तुमच्याजवळ असेल तर तुमच्या जिभेवर एकवेळ नाम येईल. ते नाम ज्याच्या जिभेवर नाचते, बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथा असे ज्याचे होते त्याची योग्यता काय असेल? सांगायचा मुद्दा देवाचे नाम मुखांत येणे ही गोष्ट सोपी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणणे सोपे आहे का? कुणीही म्हणावे इतके ते सोपे नाही. नाम घेता घेता कुठल्यातरी विचारांत जाल व बर्‍याच वेळांनी तुम्हांला आठवेल अरे आपण नामस्मरण करत होतो. नामाला धरणे सोपे नाही, सद्गुरू मार्गदर्शनाने ते सोपे होते.
(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा