’राजस्तानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कल लक्षात घेता तेथील सत्ताधारी काँग्रेसच्या बाजूनेच स्थानिक पातळीवरील मतदारांचा कौल असल्याचे लक्षात येते. गेल्या आठवड्यात राजस्तानातील जयपूर, जोधपूर, भरतपूर, सवाई माधवपूर, दौसा आणि सीरोही या सहा जिल्हा परिषदांच्या 200 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यापैकी 99 जागा काँग्रेसने, तर 90 जागा भाजपने जिंकल्या. याच 6 जिल्ह्यांतील 78 पंचायत समित्यांच्या 1564 जागांपैकी 670 जागा काँग्रेसला, 551 जागा भाजपला मिळाल्या. 40 जागी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, 11 जागी बहुजन समाज पक्ष आणि 290 जागेवर अपक्ष निवडून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांवर बाजी मारली आहे. राजस्तान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी या निवडणुका म्हणजे भाजपला झटका असल्याचे म्हटले आहे. तळागाळात काँग्रेसचे स्थान अद्यापही कायम असल्याचे संकेत या निवडणुकांनी दिले आहेत. सर्वसामान्यांच्या मनात काँग्रेसविषयी सद्भावना असल्या तरी, अंतर्गत दुफळी आणि गटबाजीचे ग्रहण या पक्षाला लागले आहे. त्यामुळेच काँग्रेसचा पाया पोखरला जात आहे, याचे भान पक्ष नेतृत्वाला ठेवावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे उद्योग केल्याने काँग्रेसला यश मिळवूनही एक जिल्हा परिषद गमवावी लागली. जयपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रमा देवी यांनी निवडणूक लढवली होती; मात्र भाजपने त्यांना आपल्याकडे ओढून जिल्हा परिषदेवर कब्जा मिळवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे सरकार लोकभावनेनुसार काम करीत असल्यानेच काँग्रेसला मतदारांनी कौल दिला असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्ष पाहत असला तरी ते अशक्य आहे, असेही गेहलोत म्हटले आहे.
गटबाजीचे ग्रहण
राज्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील गटबाजी नवी नाही. मंत्रिमंडळात फेरबदल करून आपल्या गटातील काहींना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी पायलट गटाकडून सातत्याने होत आहे. गेहलोत यांनी ती मान्य केलेली नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट हे राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. ते ना काँग्रेसमध्ये ना भारतीय जनता पक्षात अशा स्थितीत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पायलट यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षात येण्यासाठी ऑफर दिली जात आहे. मात्र भाजपमधील माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट मात्र पायलट यांच्या भाजप प्रवेशासाठी तेवढा उत्सुक नसल्याचे दिसते. पायलट आपल्याबरोबर 30 आमदार आहेत असा दावा करीत असले, तरी त्यांच्याच काही समर्थकांना भाजपमध्ये जाऊ नये असे वाटते. पायलट भाजपमध्ये जाणार असतील, तर आपला त्यांना पाठिंबा नसेल असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेसमध्ये उभे आयुष्य काढल्यानंतर भाजपमध्ये कशासाठी जायचे असा या आमदारांचा सवाल आहे. राजस्तानात भाजपच्या वसुंधरा राजे यांचा गट मजबूत आहे. पायलट आणि त्यांचे काही समर्थक भाजपमध्ये आल्यास पक्षातही राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. तीन वर्षांनंतर होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस राहील. वसुंधरा राजे यांना जगेंद्रसिंह शेखावत, सतीश पुनीया आणि अर्जुन मेघावल यांसारख्या नेत्यांशी संघर्ष करावा लागणार आहे. आगामी विधानसभेत सत्ता टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल गॅसच्या दरातील वाढ या समस्यांशी सामना करताना सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले अच्छे दिनाचे स्वप्न हे निव्वळ मृगजळ ठरले आहे. जनतेचा भ्रमनिरास झाला असून त्याचेच प्रतिबिंब सध्या होत असलेल्या निवडणुकीतून दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकी आधी असलेली पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियताही झपाट्याने घसरत असल्याचे पाहणी अहवालातून दिसते आहे. भाजपच्या विरोधात सर्व पक्षांची एकजूट झाल्यास ते भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा