जामिनासाठी मदत करण्यासाठी मागितले पाच लाख रुपये
वडगावशेरी :
जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीस जामीन मिळविण्यासाठी मदत करण्यासाठी विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षकासह एका व्यक्तीने पाच लाखांची मागणी केली. तसेच खाजगी व्यक्तीस एक लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले होते. सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 32, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे (वय 46, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदारांच्या वडिलांना अटक झाली असून, ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता. जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती. पाटील यांनी त्यांच्या ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी बुधवारी लोहगाव परिसरात पाठविले. त्यावेळी विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. खांदवे याने रक्कम कोणाकोणासाठी घेतली होती? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तपासात दोघेही सहकार्य करीत नसल्याने त्यांना विश्वासात घेऊन तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा