पुणे : सलग दुसर्‍या वर्षी कोरोना संसर्गाचे भान राखत मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा अतिशय साध्या पद्धतीने शुक्रवारी करण्यात आली. मोजकेच पदाधिकारी उपस्थित असले, तरी नगारा वादन आणि सनईच्या मंगलमय सुरावटीने केसरी वाड्यात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करण्यात आले. 
प्रथेप्रमाणे रमणबाग चौकातील महेश गोखले व विद्देश गोखले (गोखले गुरुजी) यांच्याकडून ‘श्री’ची मूर्ती घेण्यात आली. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पालखीतील बाप्पाचे टिळक वाड्याकडे आगमन झाले. त्यानंतर सकाळी 10.30 च्या सुमाराला केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणति रोहित टिळक यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, ‘केसरी’चे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर, ‘केसरी’चे हिशेब व्यवस्थापक अनिल सपकाळ उपस्थित होते. 
प्रताप बिडवे व महादेव तुपे यांच्या नगारा वादनाने सकाळीच टिळक वाड्यात आनंददायी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालखीत विराजमान झालेल्या गणरायाचे टिळक वाड्यात आगमन होताच चैतन्यमय वातावरणात भरच पडली. डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी गणरायाचे औक्षण केले. त्यानंतर ‘श्रीं’ची गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. कौस्तुभ खळीकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. यावेळी ‘केसरी’चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
    
केसरी वाड्यात चैतन्य
लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त केसरी वाड्यात चैतन्य संचारले आहे. गणपती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली आहे. विद्युतरोषणाई आणि मंदिरातील अंतर्गत सजावट उत्साह आणि आनंदात भर पाडत आहे. विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या मंदिरातील ‘श्रीं’ची लोभस मूर्ती गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. 
   
भक्तांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
गणेशोत्सवाचा मानबिंदू म्हणून केसरी वाडा गणेशोत्सवाची ओळख आहे. उत्सवातील कार्यक्रम म्हणजे भक्तांसाठी आनंद आणि मनोरंजनाची पर्वणी असते. अविरत सुरू असलेला गणेशोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन असणार आहे. येत्या 20 तारखेपर्यंत रोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम भक्तांना सकाळी 10 पासून हीींिीं:/र्र्/ूेीीींलश.लेा/ल/घएडअठखछएथडझअझएठ या लिंकवर पाहता येणार आहेत. तरी भक्तांनी ऑनलाइन केसरी गणेशोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा