पुणे : पुण्यात कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे संकटाचे भान राखत सलग दुसर्‍या वर्षी ना मिरवणूका, ना वाद्य, ना भक्तांची गर्दी, केवळ गणपती बाप्पा मोरया, ंमगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात शुक्रवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. शासन आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेश मंडळांनी मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. उत्सवाला वैभवशाली दीर्घ परंपरा असतानाही त्याचे भांडवल न करता गणेशोत्सवाला अतिशय साध्या पद्धतीने सुरूवात करून पुन्हा एकदा शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. गाजावाजा नसला, तरी आनंदी आणि उत्साही वातावरणात सार्वजनिक मंडळासह घराघरांत गणरायाचे आगमन झाले.
उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असला, तरी भक्तांना बाप्पाच्या आगमनाची लागलेली उत्सुकता शिगेला पोहचली होती. बहुतांश मंडळांनी गुरूवारी रात्रीच प्रतिष्ठापनेची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. मिरवणूका तसेच वाद्य पथके नसले, तरी बाप्पाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र जाणवत होता. काल सकाळपासून मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू झाली होती. नगारा वादन व सनईच्या सुरावटीने मंदिर परिसरात चैतन्य पसरले होते. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मानाच्या गणेश मंडळाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे, असे साकडे कार्यकर्त्यांसह भक्तांनी बाप्पाला घातले.
मानाच्या पाच मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती अशा ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा अत्यंत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पद्धतीने करण्यात आली.
उत्सवाला संख्येची मर्यादा असली, तरी महिला-पुरुष कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेसह उत्सवात सहभागी झाले होते. प्रतिष्ठापने दरम्यान मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी मास्कचा वापर केला. तसेच सुरक्षित अंतर पाळून सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली. गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेश मंडळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिष्ठापनेनंतर सहकुटुंब दर्शनाला घराबाहेर पडणार्‍या भक्तांची संख्या अत्याल्प होती. जे भक्त दर्शनासाठी बाहेर पडले त्या सर्वांनी मंदिराबाहेरूनच गणरायाचे दर्शन घेतले. यंदा रस्त्यांवर उत्सव मांडव घालणार्‍या मंडळाची संख्याही मोजकीच आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत दर्शनासाठी गर्दी झाल्याचे चित्र शहरात कोठेच पाहण्यास मिळाले नाही.
ऐतिहासिक वैभवशाली परंपरा असलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. पुण्यनगरीत गणेशोत्सवादरम्यान सादर होणारे प्रबोधनपर सजीव देखावे, मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांच्या गजरात बाप्पांना दिल्या जाणार्‍या निरोपाचा जल्लोष याची जगभरात ख्याती आहे. मात्र, जगभराचे आकर्षण ठरलेल्या गणेशोत्सवावर सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मानाच्या गणेश मंडळांनी अत्यंत साधेपणानेच मंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना करून उत्सवाचा ‘श्रीगणेशा’ केला. गर्दी टाळण्यासाठी यंदा बहुतांश मंडळाने बाप्पाच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. गणेश मंडळाचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमही ऑनलाइनच पार पडणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा